Pages

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

मराठी भाषा दिवस

#मराठी_भाषा_दिवस

मराठी भाषा दिनाच्या आपणास हार्दिक सुभेच्छा.......!

आज बरेच मराठी भाषा दिनाचे ,भाषा – प्रेमाचे, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असे अनेक मेसेज प्राप्त झाले. मुद्दामच मी सगळ्यांना रिप्लाय हा सेम टू यु (same to you ) असा दिला. अपेक्षेप्रमाणे एक दोन व्यक्तींना जाणवले आणि त्यांनी बोलून दाखवले कि तू रीप्लाय इंग्रजीतून दिला आहे.
  पण बर्याच लोकांना हे काही जाणवले नाही याचा अर्थ त्यांनी जास्त मराठी भाषा दिवस आज पण सिरीयसली घेतला नसावा असे मी ढोबळमानाने गृहीत धरून चाललो आहे  परंतु  माझा विचार कदाचित खोटा पण असेल कारण बर्याच लोकांना कळले पण असू शकते पण उलट त्यांनीच मला समजून घेतले असेल हि पण शक्यता शेवटी मी वर्तवून दाखवतो ....उगाच कोणाला राग नको म्हणून .......!

असो...

परंतु आजकाल सोशल मिडियाच्या युगात एखादा दिन साजरे करणे खूप सोपे झाले आहे. एक संदेश पाठवला कि त्याचे साधारणपणे मूर्त रूप तयार होते..पण खरोखरच आपण त्या दिनाच महत्व टिकाव म्हणून काही प्रयत्न करत आहोत का ?
प्रयत्न सोडा हे दिन का याची तरी थोडीफार माहिती घेत आहोत का ? मला तरी वाटत नाही असे आपण करत आहोत ते ....
परंतु असे करायला पाहिजे कि नाही ते प्रत्येकाने ठरवायचे आहे.

आता माझ्या आयुष्यात मराठी भाषेचे महत्व सांगायचं तर सगळ काही मराठी भाषणेच मला दिले असे मी मानतो आणि  त्या मराठी भाषेच्या उर्जीतेअवस्थेसाठी मी काहीतरी योगदान देण्याचा प्रयत्न करायला हवा असेहि मला मनापासून वाटते . जे काही माझ व्यक्तिमत्व प्रस्थापित होत आहे त्यास मराठी भाषाच कारणीभूत आहे असे मी समजतो.

कारण लहानपणी मराठी क्रिकेट कॉमेंट्रीपासून, नंतर मराठीतच भाषणे, सूत्रसंचालन असेल किंवा विविध कार्यक्रमांचे समालोचन असेल  मला माझ्या मराठी भाषेनेच खूप साथ आणि ओळख दिली आहे.  जेव्हा ह्या गोष्ठी करायच्या असतात तेव्हा भाषेचा अभ्यास महत्वाचा ठरतो आणि नकळत तसा अभ्यास होतोही आणि त्यातून जे काही मराठी भाषेत मी तोडक मोडक लेखन करण्याचा प्रयत्न करतो आहे याचे सगळ श्रेय भाषेलाच आहे , यामुळे मी समजतो कि माझ्या रक्तात मराठी भिनभिनत आहे आणि  हे माझे मराठी भाषेसाठी यश आहे.

बालवाडीत लेखनाच्या पाटीपासून ते आतापर्यंतच्या स्मार्टफोन आणि कॉम्पुटर च्या कीबोर्ड पर्यंत सगळीकडे मराठीतच खरडले आहे.(कामाच्या गोष्ठी सोडून) अगदी  chatting च्या बाबतीतहि मी नेहमी मराठीलाच प्राधान्य देत असतो तेही मराठी font मध्ये जेव्हा खरच गरज असेल तेव्हाच दुसर्या भाषेचा उपयोग.(परिस्थितीवर अवलंबून) हेही मराठीवर प्रेमच मानतो.

मी तर अशा अनेक ग्रुप मध्ये होतो जिथे फक्त इंग्रजी भाषा बोलली जात होती परंतु त्यांना देखील मराठीमय करण्यात मी यशस्वी झालो आहे. याचा अर्थ मी तिथे बोलू शकत नव्हतो असे नाही तर ओढून ताढून अनेकांनी बोलण्यापेक्षा आपल्या मातृभाषेत बोललेल कधीही चांगल असत आणि योग्य ठिकाणीच योग्य त्या भाषेचा वापर करण्यात यावा हे सांगण्यात मी त्यांना यशस्वी झालो होतो. याचा अर्थ इंग्रजीला महत्व न देणे नाही तर खरच जेव्हा त्या भाषेची गरज असेल तेव्हा बोलणे हेच आहे. एखाद्याचे standard हे त्याच्या भाषेवरून नाही तर प्रगल्भ विचारांवरून ठरते. आणि प्रगल्भ विचार द्यायला मराठी भाषा आणि मराठी साहित्य खूप मोठी भूमिका बजावत आहे असे मी मानतो.

आपण आपल्या भाषेची गोडी आपल्याला आणि नंतर इतरांना लाऊ तेव्हा आपण त्यासाठी काहीतरी योगदान दिले असे समजू शकतो.
इंग्रजी माध्यमातून  अथवा कॉन्वेंट मधून शिकलेली  अनेक  माझे मित्र-मैत्रिणी मी जे काही कधी-कधी  थोडेफार लिहील ते ‘क’ कला काना ‘का’ करून वाचन करणात आणि त्यावर आपली चांगली प्रतिक्रिया देखील देतात या पेक्षा जास्त समाधान मला दुसरे वाटत नाही.

असो....
परंतु काही गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत.

जे वापरलं जात नाही त्याचा अंत होतो भाषाही अशीच आहे.
भाषा प्रवाही राहिली तर टिकते ,तिच्यात नवनव्या शब्दांची भर पडत गेली तर ती वाढते. जेव्हा एखाधी भाषा आपण प्रमाणभाषा असे म्हणतो तेव्हा इतर बाकीच्या बोली भाषा आपण गावढी ,गावंढळ अथवा त्यांना आपण दुय्यम स्थान देतो. साहजिकच ती भाषा वापरणार्याला न्यूनगंड येतो. (उदा. इंग्रजी न येणाऱ्या व्यक्तीला आपल्याला काहीच न येणे असे वाटल्यासारखे ) आता यासाठी आपण काय करायला पाहिजे हे महत्वाचे आहे. ते सर्वस्वी प्रत्येकावर अवलंबून आहे.

असे म्हणतात कि भाषा मरत नाही परंतु मी असे म्हणेल कि भाषा मरत नाही पण  भाषिक मरतात त्यांचे विचार मरतात. आपल्यापैकी अनेकांना महत्वाच्या व्यवहार क्षेत्रात मराठी भाषा वापरायची लाज वाटते ,अपराधीपणाचे वाटते. कदाचित याला सभोवतालची समाजव्यवस्था जबाबदार असेल.

खर सांगायला गेल तर आपल्याच मातृभाषेपासून आपण दुरावत चाललो आहोत. भाषेच्या शुद्धतेला आपण पारखे होत आहोत. एकीकडे इंग्रजीसारख्या भाषेचा द्वेष तर करायचा नाहीच किंवा त्याचे ज्ञानहि मिळवायचे हे आव्हान आहेच.. त्याचबरोबर आपली भाषा समृद्ध करायची तिचा प्रचार –प्रसार करायचा आणि तिचे चिरंतनत्व अभाधित हे सुद्धा मोठे आव्हान आहे.

आज सर्वजन आपल्या भाषेवर प्रेमदाखवत आहे याचा नक्कीच मला सार्थ अभिमान आहे. आता फक्त याच दिवशी भाषेचा उदोउदो न करता काहीतरी भाषेच्या प्रगतीसाठी गोष्टी आचरणात आणल्या पाहिजे.  आता आचरणात आणणे जमेल का नाही तोही मोठा प्रश्न आहे! परंतु अशा प्रकारचे दिन नक्की का? याची मराठीतून माहिती जरी घेतली तरी ते स्वता:साठी आणि मराठी भाषेसाठी योगदानाच ठरेल.

शेवटी फक्त एकच प्रश्न मनात निर्माण होत आहे कि इतका दैदीप्यमान इतिहास असलेली मराठी भाषेचा वर्तमान इतका केविलवाणा कसा बनत चालला आहे ? त्याला कदाचित आपण सर्वच जबाबदार तर नाही ना ? आणि याचे उत्तर कदाचित हो असे आहे असे मला वाटते.......!

✍🏻गणेश सातकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा