Pages

बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

बैल पोळा काही आठवणी ...!!

बैल पोळा......काही आठवणी .......!!!

शेतकऱ्यांची जान असलेल्या सर्व माझ्या बांधवांना श्रावणी बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेछा.

बळीराज्याला वर्षभर जिवभावाच सोबती कोन असेल तर ती आपली बैल जोडी. ह्या बैलराज्याप्रती प्रेम व्यक्त करन्याचा हा दिवस.

शेतकऱ्याचा बैल आणि गरीबाची बायको आजारी पडू नये’ अशी एक ग्रामीण म्हण आहे. यावरूनच शेतकऱ्यासाठी बैल किती महत्वाचा व अनिवार्य आहे हे समजून येते. बैलाचे शेतकऱ्यावर खूप उपकार असतात व हे तो आयुष्यभर फेडू शकत नाही म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा अत्यंत आत्मीयतेने साजरा केला जातो.



म्हसवंडीचा ( माझ्या गावचा ) बैल पोळा......!

सह्याद्रीच्या कुशीत, दोन जिल्हे आणि तीन तालुके यांच्या सरहद्दीवर, डोंगरदऱ्यांमध्ये वसलेले जेमतेम दोन अडीच हजार लोकसंख्या असलेले माझे छोटेसे म्हसवंडी हे गाव.

गावचा मुख्य व्ययसाय हा शेती त्यामुळे आमच्या गावच्या बैलपोळ्याला देखील वेगळाच महत्व आहे. गाव थोड पारंपारिक व अध्यात्मिक असल्यामुळे पोळ्याच्या दिवशी पाउस पडतोच अशी आख्यायीका आहे.

हि गोष्ठ वैज्ञानिकदृष्ट्या कशीही असली तरी गावच्या लोकांचे समाधान यात होते कि आतापर्यंत पाऊस आला नाही पोळ्याला नक्की येणार हा एक भाभडा विश्वास निर्माण होतोय आणि हि गोष्ट शेतकऱ्यांसाठी खूप दिलासादायक असते. परंतु यावर्षी आतापर्यंत भरपूर पाऊस पडला आहे तरीही मी प्रार्थना करतो की आज देखील जोरदार पाउस पडेल.


यात्रा, दिवाळी येवढेच महत्व आमच्या इथे बैलपोळ्याला आहे. सर्व मुंबईकरपुणेकर किंवा जे कोणी नोकरीधंद्याच्या निमित्ताने बाहेर असतात आवर्जुन ह्या सणाला गावी जातात. अगदी शेवटच्या वर्षापर्यंत मीही पोळ्याला आवर्जून जायचो पण आज जाता आले नाही.


पण मला काहीच वर्षांपूर्वीचे दिवस आठवतात...........,

बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी ओढ्यावर बैल न्यायचे.
चांगले घासून पुसून धुवायचे.

चिखलात माखलेले आजोबा व मी आणि चमकणारे बैल. वडील गावच्या नाटकाच्या तयारीत मग्न असल्यामुळे हि कामे आजोबा आणि मलाच करावी लागत असे.

धुताना बैलांशी चाललेल्या गप्पा.  त्याच्या मानेला घासताना त्यानेही आपल्या मानेला घासून दिलेली पसंती.
त्याला लाड कसे करून घ्यायचे चांगलंच समजायचं. पोळ्याच्या दिवशी दुपारपासून बेगडबाशिंग,  झालरी,  रिबिनीफुगे, रंग घेऊन बैल सजवायचे.

शिंगाला पितळी टोपत्याला गुलाबी लोकरीचे गोंडे,
हिरव्यालाल रंगानी बैलाच्या पाठीवर त्यांची नाव रंगवायची.

असला सगळा जामानिमा करून बैल व घरून केलेला पुरण पोळीचा नैवद्य घेवून डोंगरावर असलेले आमचे ग्रामदैवत मळादेवी मातेच्या मंदिराला वाजत गाजत प्रदिक्षिणा घालून बैल पुन्हा गावात मारुतीच्या मंदिरासमोर मिरवणुकीसाठी आणायचो.

bail pola photo ganesh satkar mhaswandi
    २००३ सालच्या पोळ्याची आठवण ...(मळादेवी मंदिराजवळ) 

दिवस मावळतीला गेलेला असायचा.

त्यालाही पोळा फुटायची वाट असायची म्हणून उगाच रेंगाळत बसायचा.

डफडसंबळ  आणि ताशाच्या तालावर बैल झुलायचे. मग आम्हीही खूप नाचायचो. पारावर मांडीवर मांडी  टाकून बसलेले आजोबा आणि ज्येष्ठ मंडळी आमचं नाचणे पहायचे  आणि त्यापेक्षाही गावात बाहेरून आलेल्या नवीन मुली त्यामुळे आम्ही आणखीच नाचायचो आणि संध्याकाळी घरी येऊन पोटफुटत पर्यंत पुरणपोळी, गुळवणीसार – भात खायचो.


हे सर्व काही असले तरी सर्वजन आतुरतेने वाट बघत असायचे ते एका गोष्टीची......

पुर्वी पोळ्याच खास आकर्षन होते ते म्हणजे गावातील कलाकारान्नी सादर केलेले रात्रीचे नाटक.

माझ्या वडिलांना नाटकाची आवड असल्यामुळे आणि ते स्वतः लेखक असल्यामुळे त्यांचा यात संपूर्ण सहभाग.

१९८६ साली वडिलांनी लिहिलेल्या 'देवा तुझा न्याय कसानाटकाचा पहिला प्रयोग देखील गावात झाला होता.

नंतर गावातील कलाकारांनी विविध प्रकारची ऐतिहासिक, सामाजिक, कौटुंबिकअनेक नामवंत लेखकांची नाटके पोळ्याच्या निमित्ताने सादर केली आणि ते पाहण्याची मज्जाच वेगळी होती.

कारण बाहेरून बोलावलेल्या तमाशा किंवा और्केष्ट्र पेक्षा गावातील कलाकारांनी आपापली शेतीच्या कामातून वेळ काढून संपूर्ण एक ते दीड महिना रीअसल करून सादर केलेले नाटक बघण्याची मज्जाच काही औरच.


आज गावात काही कारणास्तव नाटक नाही तरी देखील हा सन उत्साहात साजरा होइल.


आज ते सर्व मिस करतो आहे.........!


आणि आता अशीही परिस्थिती झाली आहे कि,

ओढ्याला पाणी आहे पण दावणीला जनावर नाही.

पोळा येणार आणि जाणार.
मातीचे बैल आणायचे अन पूजा करून घास घशाखाली ढकलायचे.

पुरणाचा घास आजकाल कडू लागाय लागलाय किंवा तशी सुरुवात झाली आहे....!


---------------------------