Pages

मंगळवार, १९ एप्रिल, २०१६

मी... एक अपघात... आणि काही दिवस.....!


         तो क्षण आठवला कि अजूनही संपूर्ण डोळ्यासमोर अंधारी निर्माण होते, हात – पायांचा थरकाप होतो, छातीची धडधड अचानक वाढते आणि मन सुन्न होऊन शरीर स्वस्थ पडते. कारण जो प्रसंग त्यादिवशी घडला त्याने संपूर्ण जीवनाकडे पाहण्याची वृत्ती बदलून टाकली........!

मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा होता. तसेही मला कामाला चार दिवस सुट्ट्या होत्या, कारण सर्वात जास्त जोडून आलेल्या सुट्ट्यांपैकीच त्या होत्या. गावाला जाऊन दोन-तीन लग्नांना जाण्याचा विचारपण होता आणि तसेच थोडा घरी आराम करवा असे वाटत होत, पण या मस्त सुट्ट्यांमध्ये एक गोष्ठ मध्ये येऊन टपकली ती म्हणजे माझ्या एम. ई. ची cPGCON हि कॉन्फेरेंस.

जीकि २५ आणि २६ या दोन दिवशी होणार होती आणि ती अटेंड करणे हे अनियार्य होते . त्यामुळे चार-पाच दिवसाच्या सुट्टीवर तर संपूर्ण पाणी फिरले होते.


आदल्या गुरुवारच्या दिवशी दुपारी २४ तारखेला मस्त मित्रांसोबत धुलीवंदन साजरी करून संध्याकाळी मित्राच्या रूमवर आम्ही स्वतःलाच रिअल हिरो समजणाऱ्या चार मित्रांनी रूमवर बिर्याणी बनवून थेट सरांनाच आमंत्रण दिले आणि सरांसोबत तीन तास गप्पा मारत एका प्रकारची स्वस्तात मस्त अशी पार्टीच केली होती. त्यामुळे रात्री मिन्त्रांबरोबर गप्पा मारता मारता झोपायला तसाही खूप उशीर झाला होता, तो दिवस खूप मजेत गेला होता .

दुसरा दिवस होता शुक्रवार, दिनांक २५ मार्च २०१६, सकाळी उठायला उशीरच झाला होता, सकाळी ९ वाजता PCCOE कॉलेजमध्ये(ज्या ठिकाणी कॉन्फरन्स होती ) जाऊन रिपोर्टिंग करणे गरजेचे होते. घाईघाईत आवरून माझ्या दररोजच्याच ८:४८ वाजताच्या लोकलने मी निघालो. सव्वा नऊ वाजता पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, आकुर्डी मध्ये मी पोहचलो. मित्रांना फोन केला रजिस्टेशन प्रोसेस कशी आहे कुठे आहे विचारून घेतले आणि कॉन्फरन्सच्या ठिकाणी पोहचलो.

अतिशय भव्य दिव्य असे आयोजन आणि नियोजन पण तसेच,उत्तम व्यवस्थापन सगळच एकदम भारी होत.
आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे जेवणाची व्यवस्था. मित्रांसोबत कॉन्फरन्स हॉलमध्ये जाऊन पहिला सेशनचे सर्व औपचारिक काम पूर्ण केले. दिवस एकदम आनंदी चालला होता.

दुपारी बारा वाजता या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ होता आणि तोही कुलगुरू वासुदेव गाडे यांच्या उपस्थितीत, त्याठिकाणी थोडा वेळ थांबलो पण तिथे काय चित्त लागेना कधी कार्यक्रम संपून भोजन करू असे झाले होते. शेवटी कसाबसा वेळ काढून कार्यक्रम संपवून जेवणाकडे आलो.

अतिशय सुंदर व्यवस्थापण तसं जेवणहि तितकंच चांगलं. जवळ दहा पक्वान भोजन व्यवस्था त्यात वेगवेगळ्या आईसक्रीमचे वेगळे कुपन्स. मस्त जेवण केले. काही क्षणात मनात कल्पना आली माझ्याकडे तर कुपन्स आहेत. त्यात भोजनासाठी फक्त आई.डी ची गरज तेही माझ्याकडे आहेत मग मित्रांना का नको बोलवायला? दुसर्याला जेवण देण्यात जो आनंद आहे तो दुसर्या कशातच असू शकत नाही.

लगेल फोन केला एका मित्राला, परंतु तो बाहेर असल्यामुळे त्याला येन शक्य नव्हते. दुसर्याला फोन केला परंतु तोही जेवला होता. मनातविचार आला नको जाऊदे...

पण न राहून परत मग निखीलला फोन केला तोही झोपला होता परंतु आग्रहखातर येतो बोलला. अर्ध्या तासाने जवळ-जवळ दोन वाजता तो आला आम्ही भेटलो ,थोडं फिरलो आणि मग थोडं जेवणही केलं.


शेवटचा सेशन अडीच वाजता सुरु होणार होता. त्यात निखीलहि बोलला माझे आपल्या कॉलेजकडे काम आहे मी ३ वाजता जातो आहे तूझे काम होत असेल तर आपण बरोबर जाऊ. माझे संपूर्ण काम तर झाले होते. फक्त जाऊन सह्या करून यायचे होते, परंतु तीच मोठी गोष्ठ होती. कुठलाही संकोच न करता मी हो बोललो. निघताना फोन कर असे म्हणून तो रूमवर गेला.


मीही मिन्त्रांसोबत कॉन्फरन्स हॉलमध्ये जाऊन सह्या करून माझे काम पूर्ण केले, तसे सेशन पूर्ण होण्याअगोदर उठून बाहेर जाने म्हणजे चुकीचे वाटत होते परंतु एका क्लासमेटचा मोबाईल फोन चोरीला गेला होता ह्याचे थोडे उदात्तीकरण करून बाहेर आलो. मोबईल सापडण्यासाठी थोडासा पुढाकार घेऊन cctv सर्वर रूम मध्ये देखील थांबलो परंतु cctvला storage नाही हे कळल्यावर कॉलेजच्या व्यव्स्थापणाला दोष देत बाहेर आलो या प्रकारामुळे थोडा उशीरच झाला होता आणि निखीलला फोन केला.

निखीलहि बोलला तू स्टेशनवर ये तोपर्यंत मीही पोहचतो. परंतु थोड्या वेळात परत त्याचा फोन आला आणि बोलला मला पोहचायला थोडा वेळ होईल आपली लोकल जाईल आपण बाईकवर जाऊयात. कदाचित हीच वादळापूर्वीची शांतता होती.


थोड्याच वेळात निखील गेटवर पोहचला गाडी होही R15 नेहमीचीच. खूप वेळा त्यावर बसून फिरलेलो. एका शोर्टकट पण माझ्यासाठी नव्या असलेल्या रस्त्याने आम्ही पुणे- मुंबई एक्प्रेस हायवेकडे निघालो त्यावर निखीलचे उद्गार निघाले ‘यु आर गोइंग टू शॉक’.

थोड्याच वेळात आम्ही नेहमीच्या रस्त्याला लागलो, सुसज्ज केलेल्या पीएमटी स्टेशन पाहत मी मागे बसलो होतो. काहीच वेळात मुकाई चौकातून ब्रिजखालून पुणे-मुंबई एक्प्रेस हायवे क्रॉस करून आम्ही ओल्ड पुणे मुंबई हायवेला लागलो.

लवकरच रूमवर जाऊन आराम करण्याचा विचार होता. गहुंजे क्रिकेट स्टेडीअम जवळ आल्यावर सहज घड्याळाकडे पहिले तर दुपारचे ३ वाजून ३५ मिनिटे झाली होती, त्यातच निखिलच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडले आपण कुठेतरी चला पिउयात, मीही बोललो ठीक आहे एखाद्या चांगल्या ठिकाणी पिऊयात. मागे मला थोडी अडचण होत असेल यामुळे निखिलने त्याची बेगहि पुढे घेतली होती.



तिथून पुढे अंदाजे दोनच मिनिटे झाली असतील म्हणजेच वेळ अंदाजे ३ वाजून ३७ मिनिटे आम्ही देहूफाटा क्रॉस करून पुढे निघालो गाडीचा स्पीडहि होता ६५ ते ७० च्या दरम्यान मागे हातात एक फाईल घेऊन मी कुठल्याही आधाराविना निवांत बसलो होतो, तो क्षण सगळ काही आता स्पष्ट आठवतय पुढून क्विड गाडी डीवायडर मधून वळत होती, आम्ही जात पर्यंत कदाचित ती संपूर्ण निघूनही गेली असती परन्तु सावधानता म्हणून निखीलने गाडीचा स्पीड कमी केला तोपर्यंत क्विड गाडी संपूर्ण क्रॉस झाली होती, आणि तेव्हढ्यात अचानक स्पीड कमी झाल्यामुळे मागून येणाऱ्या एका फोर व्हीलरने ( स्कोर्पिओ असावी असा अंदाज) जोरदार मागून गाडीला धडक दिली. चूक आमची नव्हती असेही म्हणता येणार नाही कारण एका हाताने कधीच टाळी वाजत नाही परंतु जास्त चूक नव्हती असे म्हणता येईल. मी मागे अगोदरच चार फुटावर बसलो होतो, इतक्या जोरदार धडकेने मी आणखी दोन फुट उडालो म्हणजे जवळजवळ सहा फुट हवेत उडून मी खाली पडलो. तेव्हढ्यात आमची गाडीहि जाऊन एका मोटारसायकला जाऊन ठोकली होती. माझे डोळे अचानक बंद झाले होते बेशुद्द अवस्थेत मी जवळ जवळ एक ते दीड मिनिटे मी रस्त्यावर होतो. एक मिनिटाच्या अंधारीनंतर मला शुद्ध आली हायवेच्या मधोमध मी डांबरीवर पडलो होतो पुढे मोटारसायकल वाला देखील त्याची गाडी सावरत होता सगळ्या गाड्या येऊन थांबल्या होत्या निखीलहीगाडी उचलून साईटला घेत होता आजूबाजूला जमा झालेले लोक उचला, डॉक्टरकडे घेऊन चला असे बोलत होते तर मला जाणवले डोक्याला काहीतरी लागले आहे, हात कपाळावर गेला आणि कपाळावर जवळजवळ एका टेनिस बाल पेक्षाही मोठ्या आकाराचे टेंगुळ माझ्या हाताला लागले. आणि त्यातच मी डिप्रेशनमध्ये गेलो. ओठांतून सगळ्या अंगावर रक्त पडत होते. मी खूप घाबरलो होतो. काहीतरी मोठा गुन्हाच केला आहे असे मला वाटत होते. शुद्ध आल्यानंतर माझे विचारचक्र दुपटीने गती घेऊ लागले.



एक स्कोर्पिओ वाला उठवून गाडीत बसउ लागला परंतु मला भीती होती मी केलेल्या काहीतरी वेगळ्याच गुन्ह्याची. घरचे बोलतील परंतु मी चांगल्या कामाला गेलो होतो याचा प्रूफ म्हणजे फाईल होती मी ती शोधत होतो, लोक गाडीत बसा बोलत होते, परंतु मी दूर पडलेली फाईल घेऊन आलो आणि गाडीत बसलो, खूप रक्तस्राव चालू होता ओठातील काही रक्त मी गिळूनहि घेत होतो. गाडीत बसल्यानंतर मी निखीललाही बोलावत होतो परंतु गाडीची काच काही केल्या मला उघडत नव्हती. कुठलाही वेळ न घालवता त्या गाडीवाल्या (देवमाणसानेच म्हणा) मला जवळच्या आधार हॉस्पिटलमध्ये आणले. अवघ्या पाचव्या मिनिटात मी दवाखान्यात होतो. परंतु त्या गाडीतल्या दोन मिनिटांच्या क्षणात विचारचक्र इतके फास्ट झाले होते कि निखीलच्यागाडीचे जास्त नुकसान नसेल ना झाले , आता पोलीस केस होणार त्याहीपेक्षा जीवनमरणाच्या गोष्टीचा विचार मनात येत होता आता सगळ्याच बाजूने कचाट्यात आपण सापडलो आहे असे वाटत होते.


दवाखान्यात पोहचल्यावर लगेच मला स्ट्रेचरवरून अपघात विभागात घेऊन गेले. जाता जाता माझा फोन वाजला मित्राने फोन केला होता.  मी फोन उचलून डॉक्टरकडे दिला आणि पत्ता सांगायला सांगितले. लगेच दोन तीन डॉक्टर आणि बाकीचा स्टाफ उपचाराला लागला.  दोन्ही ओठामधे दात घुसले होते हाताला थोडे खरचटले होते,
डोळ्याच्या खाली संपूर्ण गालावर जखम झाली होती.  भयानक असे डोक्याला टेंगुळ आले होते, वरचा ओठ फाटला होता, एक दातही तुटला होता. असंख्य वेदनेसह मी उपचार घेत होतो,
ओठाला सहा टाके टाकले पडले होते, दोन्ही ओठांनाच्या खाली रक्तस्राव थांबवा म्हणून मेडिकल पॅड ठेवण्यात आले. इन्जेक्षण देण्यात आले त्यामुळे वेदना काहीश्या कमी झाल्या होत्या. चेहऱ्याची उजवी बाजू पूर्ण सुजली होती.  मी पूर्णपने डिप्रेशनमध्ये चाललो होतो.


लगेच ct स्कॅन साठी मला नेण्यात आले. सर्वात महत्वाची गोष्ठ हि होती कि मी संपूर्णपणे शुद्धीवर होतो. ct स्कॅन रूम मध्ये खूप सारी थंडी वाजू लागली पण सांगणार कोणाला जवळ जवळ १५ मिनिटे स्कॅनिंग चालू होते त्यात माझी अवस्था काय झाली होती त्याचे वर्णन मी करूच शकत नाही.

आणि याचदरम्यान मित्र तिथे येऊन पोहचले. त्यांनी थोड्याच वेळात निखीललाही तिथेच आणले. माझा ब्लडप्रेशर कमी होत होता त्यानंतर डिरेक्ट आय सी यु मध्ये हलवण्यात आले. बरेच मित्र आले होते. तोपर्यंत निखीलचाही चेकअप झाला त्यालाही हाताला फ्रक्चर होते.

आय सी यु मध्ये गेल्यानंतर ऑक्सिजन मास्क लावण्यात आला. मनातून मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होतो. कारण मला हे माहित होते मानसिक दृष्ट्या जर आपण बरे असलो तर आपण लवकर बरे होऊ शकतो. प्रत्येक नवीन डॉक्टर येऊन विचारपूस करत होता. माझ्या मनात शंका एव्हढीच होती कि मेंदूला मार लागलेला नसावा.


तोंडाला इतके लागलेले आणि हातापायाला काहीच न झालेलं यावर कोणत्याच डॉक्टरांचा विश्वास नव्हता त्यामुळे प्रत्येक डॉक्टर आल्यानंतर एकाच बोलत होता, हात वर करा पाय वर करा, चक्कर येत आहे का ? फीट चा काही प्रोब्लेम ? उलटी झाली होती का ? प्रत्येक डॉक्टर ला हे सांगून मी वैतागलो होतो. परंतु मानसिक अवस्था माझी बळकट झाली होती कारण यापैकी काही नाही मग माझा धोका टळला आहे असे मला वाटत होते. त्यातच मी डॉक्टर ला सांगत होतो माझ्या चेहर्याला काही झाले नाही पाहिजे एकदम व्यवस्थित उपचार करा.


उद्यापर्यंत मी बरा होणार अस माझ मन सांगत होत. मित्र भेटायला येत होते बाकीची सगळी जबाबदारी मित्रांनीच पार पाडली. घरी सांगू नका मी उद्यापर्यंत होईल व्यवस्थित आणि उद्या आत्याच्या मुलाचे लग्नहि आहे त्यामुळे उद्या संध्याकाळी फोन करू असे मी सांगितले. मी खूप चांगला आहे असे मला वाटत होते परंतु सगळे काही विदारक ,भयानक घडले होते. परीस्थीतीची जाणीव ओळखून मित्रांने माझ्या दाजींना फोन केला त्यांनीही बहिणीला वेगळच कारण सांगून आले त्यादरम्यान निखिलचे मामाही आले होते. मित्रांची भेटायला रांग लागली होती परंतु आय सी यु मध्ये असल्यामुळे आतमध्ये सोडत नव्हते. खर्या वेळेला धावून आलेल्या सगळ्याच मित्र-मैत्रिणीनी आपापल्या परीने जबाबदारी स्वीकारून काम करत होते.

लेझीमच्या निमित्ताने वडील मुंबईला होते घरी फोन लागणे दुर्मिळच तरीही कसेबसे दोन्हीकडे मित्रांने संपर्क साधला मला काहीही माहित नव्हते.

रात्री दहा वाजता रिपोर्ट आले. सगळ्या गोष्ठी या नॉर्मल आहेत असे डॉक्टर न्युरो सर्जनला सांगत होते, ते मी ऐकत होतो. त्यामुळे माझे मानसिक मनोबल आणखीच वाढले. भेटायला येणाऱ्या प्रत्येकजन मला पाहून गळून पडत होता. दररोज हसणारे मित्र मैत्रिणी मला पाहून सुन्न होत होते. तरीही मी त्यांना ईशार्यातून एकच सांगण्याचा प्रयत्न करत होतो कि स्माईल करा मी बरा आहे. काही वेळा तर ओक्सिजन मास्क काढून मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो कि मी पूर्ण बरा आहे.


रीपोर्ट ऐकल्यानंतर मी एका डॉक्टरला बोलावून विचारले मला खरच आय सी यु मध्ये ठेवण्याची गरज आहे का ? त्यावर डॉक्टरचे असे म्हणणे होते कि थोडेसे मेंदूला मार आहे २४ तास अंडर ओब्सरव्हषण ठेवावे लागेल. मग डॉक्टर ला पुन्हा विचारले इथे राजीव गांधी आरोग्य योजना आहे का ? त्यावर त्यांचे उत्तर आले नाही ...त्यावर आणखी एक गोष्ठ लगेच माझ्या मनात आली ती म्हणजे पैसे?


लगेच डॉक्टरला बिलाबद्दल विचारले ? त्यावर त्याचे म्हणणे होते कि तुला बरे होणे महत्वाचे कि पैसे ? माझ्याबरोबर कोणी नाही आहे मी इकते सारे पैसे भरू शकणार नाही मला गरज असेल तरच आय सी यु मध्ये ठेवा असे मी त्यांना सांगत होतो. त्यावर उद्यासकाळी चेकअप करून आपण जनरल वार्डला शिफ्ट करू असे सांगण्यात आले.


मी उद्याची वाट पाहत होतो परंतु वेळ काही केल्या जात नव्हता मी वारंवार घड्याळाकडे पाहत होतो. अर्धा तास मला एका रात्रीसारखा वाटत होता. डोक्यात नुसते विचार चालू होते. अनेक जनांचे झालेले अपघात मला आठवत होते . त्यांची परिस्थितीहि डोळ्यासमोर येऊ लागली. डोळ्यातून सारखे अश्रू वाहत होते. काहीतरी खूपच मोठा गुन्हा मी केला आहे असे मला वाटत होते. विधात्याला पण मीच सापडलो होतो. सर्वजन माझ्यासाठी लवकर बरे हो असे प्रार्थना करत होते तर मी इकडे मलाच कोसत होतो.


रात्रीचे सव्वादोन वाजले होते. मला तर झोप येतच नव्हती, अचानक आय .सी यु चा दरवाजा वाजला, सिस्टर दरवाजा उघडायला गेली आवाजाची कुजबुज मला ऐकू आली पेशंट झोपला आहे त्याला भेटता येणार नाही असे ती सांगत होती, एक मित्र तिला सांगत होता कि त्याचे वडील भेटायला आले आहे फक्त एक मिनिट त्यांना पाहू द्या. हे ऐकताच अचानक माझ्या डोळ्यात पाणी आले. ऑक्सिजन मास्क काढून मी मोठ्याने आवाज दिला ओ.... येउद्या त्यांना.....



वडील आतमध्ये आले माझ्याकडे पहिले –खिन्नतेने ,विषन्नतेने. मनातून संपूर्णपणे खचले होते. मीच बोलून त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो कि इथेच फक्त तोंडाला खरचटले आहे बाकी नॉर्मल आहे. सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे. उद्या बाहेर घेणार आहेत. काही काळजी करू नका. मी फक्त मला बरे दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. पण माझे शरीर मुख्यता चेहरा काहीतरी वेगळेच वर्णन करत होता. ते पाठमोरी फिरले आणि नकळत परत डोळ्यातून पाणी आले.

विचारचक्र चालू झाले झोप काय येत नव्हती मित्र बाहेर बसून होते. कशीबशी रात्र गेली तेही रडत कण्हत.

दुसरा दिवस उजाडला मी वाट पाहत होतो बाहेर कधी काढतायेत. परंतु कोणीही मला काही सांगत नव्हते. सिस्टर ला विचारले असता डॉक्टर आल्यावर तुमच्या नातेवाईकांना सांगतील मग घेऊ बाहेर. पुन्हा मित्र नातेवाईक यांची गर्दी चालू झाली. सर्वजन भेटायला येऊ लागले. १० वाजता मुख्य डॉक्टर आले सगळी तपासणी केली. आता काही धोका नाही असे त्यांनी सांगितले.


घरी सर्वांना कळले होते,घरच्यांच्या मनस्थितीची कल्पना मी करूच शकत नव्हतो. निखिलचे आईबाबा येऊन तेही धीर देऊन गेले आणि त्यातच माझी आईदेखील गावावरून येत आहे असे मला कळले. मी वाट पाहत होतो, तिला उत्तर काय द्यायचे हेही विचार करत होतो. जवळ जवळ एक वाजता आई,बहिण आणि आत्या आली. आत्या आणि बहिण पुढे आली,मला पाहून सुन्न झाल्या , आणि त्यामागून आई आली पाहून एकदमच मोठमोठ्याने रडायला लागली. मला सांगितलं ‘काही नाहीझाले आणि माझ्या पोराला इथ किती लागले आहे’ असे ती रडता रडता म्हणत होती. सिस्टरहि सांगत होत्या काही झाले नाही बरे आहे त्याला काळजी करू नका. मी ओक्स्जीन मास्क काढून आईला सांगत होतो होतो मला काहीही झाले नाही बरे आहे. आई बाहेर जाऊन पण रडत होती. सगळेजण तिला समजवत होते परंतु शेवटी आईचे प्रेम आहे ते... जिथे मला पाहून माझे मित्र-मैत्रिणी रडले तिथे आईचे रडणे लाजमी होते.


जोपर्यंत चेहऱ्याची सूज कमी होत नाही तोपर्यंत हॉस्पिटल मध्ये ठेवावे लागेल असे डॉक्टरने सांगितले. जनरल वार्डसाठी भाडेही खूप होते त्यामुळे राजीव गांधी योजनेमध्ये स्टार हॉस्पिटलला हलवण्याचा निर्णय घेतला.


सर्वजन डीक्चार्गच्या तयारीला लागले, बिल भरमसाठ झाला होता, प्रत्येकजण मित्र आपापले प्रयत्न आपापली ओळख वापरून बिल कमी करण्यासाठी प्रयत्न करत होते. अगोदरच निखिलच्या मामाने दोघांचीही एडव्हांस पैसे दिले होते तरीही योग्य बिल कमी होत नव्हता. शेवटी एका मित्राने थेट आमदारांपर्यंत संपर्क साधून जवळजवळ ३३% बिल कमी झाले आणि यातच प्रत्येकाच्या ओळखींची धन्यता होती. या गोष्ठी मला काही माहित नव्हत्या.


एकाने गाडी आणली. दुसर्याने कपडे घालण्य्साठी विकत घेत होता तर अनेक आपापल्या परीने धावपळ करत होते. याचदरम्यान तिकडे निखिलचे ऑपरेशनदेखील झाले होते. तो तिथेच होता.

दुपारी ३ वाजता डीक्चार्ग मिळाला आणि स्टार हॉस्पिटल निगडीला भरती झालो. तिथे अशी आशा होती कि राजीवगांधी आयोग्य योजनेअंतर्गत एडमिट होऊ परंतु आजार त्या योजनेत बसत नसल्या कारणाने तसेच भरती झालो.


गावावरूनसुद्धा मित्र आले होते. अनेकांचे फोन येत होते त्यांना उत्तर मित्रच देत होते, कारण बोलता येत नव्हते. काहीतरी खाव अस वाटत होत पण खाऊ शकत नव्हतो. खाण्यापिण्याची चिंता न करता सर्वजन मित्र बरोबरच होते नातेवाईकहि होते,घरचेहि होते.

तिथेही उपचार चालू झाले, वरून माझी अवस्था खूपच भयानक होती. अनेक मित्र-मैत्रिणी, नातेवाईक भेटायला येत होते एकदा तर रेसेप्षण टेबल बर बोलण्यात आले कि ,हे काय कॉलेज आहे की कॉलेज कट्टा.

आलेला प्रत्येकजन पैशाचे विचारात होते सरांनी तर स्वतःचे atm मित्राकडे दिले होते लागतील तेव्हडे काढ म्हणून. प्रत्येकानेच आपापल्या परीने आधार देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे ऋण फेडणे कठीण आहे.


चार दिवस तिथे हॉस्पिटल मध्ये होतो, घरचे , मित्र सगळेच तिथेच बॉडीगार्डसारखे माझ्या बरोबर होते. माझ्या चेहऱ्याची अवस्था खूप वाईट ,भयानक झाली होती त्यामुळे मजाकमध्ये मित्र मला बोलत होते ‘आता मुलगी भेटणे अशक्य आहे लवमेरेज शिवाय पर्याय नाही आणि लवमेरेजला आलेली मुलगी सुद्धा आता लग्न करणार नाही’ खूप अवघड आहे आता तुझे. काही जन बोलत होते आपण चांदीचा दात बसवू तर काही बोलत होते आपण सोन्याचाच बसवू वेळ आनंदी ठेवण्याचा एक लाजीरवाणा प्रयत्न होता फक्त तो.



सहज एक दिवस हॉस्पिटलमध्ये एक गाण चालू होते “सुख में सब साथी दुख में ना कोई”


हे गाण ऐकून खरच डोळ्यात पाणी आले कारण माझ्या बाबतीत सगळे उलटे झाले होते सगळे जन ज्यांच्याकडून अपेक्षाहि नव्हते असे लोक सुद्धा मदतीला धावून आले होते.


पाच दिवसानंतर सूज कमी झाली आणि डीक्चार्ग भेटला तिथेही मित्रांच्या ओळखीने पुन्हा बिल कमी करण्यात मदत झाली.

त्या चार-पाच दिवसात होते नव्हते जुने क्लासमेट, सर, कामातले , मित्र, ओळखीचे असे सगळे भेटायला आले होते. यातच माझी धन्यता होती.

खरी कहाणी होती ती गावातली...




डीक्चार्ग भेटल्यानंतर दुसर्या दिवशी मी माझ्या गावी म्हसवंडीला घरी गेलो. जसे मला येताना पाहिले काहींना घरी आलो असे कळले लगेच आजुबाजुतील लोकांची गर्दी घरी मला पाहण्यासाठी झाली. हि तर नुकतीच सुरुवात होती. दुसर्या दिवशी जवळजवळ सगळ्या गावात मला घरी आणले आहे हे समजले होते. मी सकाळी उठायच्या आताच गावातील अनेक जन घरी आले होते. तबियेत कशी आहे ? डोक्याला मार तर नाही ना ? जास्त लागले तर नाही ना ? सगळे कसे झाले ? काळजी घे ...! जास्त बोलू नको ...! हे त्यांचे उद्गार असायचे.


कधी मनी कल्पनाही केली नव्हती कि असे काही होईल. अनेक नातेवाईक आपापला वेळ काढून भेटायला येत होते. आणलेल्या खाऊचा खूप मोठा ढीग झाला होता मला ओठांना टाके व जखम असल्यामुळे खाता येत नव्हते सगळ काही तसच पडत होते.

त्या आठ दिवसात गावातील असे कुठलेच घर नसेल कि ज्यातील व्यक्ती मला भेटायला आली नाही....मी मलाच आतून कोसत होतो. मी काहीतरी चूक केली आहे आणि त्याची शिक्षा इतरांना भोगायला लागत आहे असे मला वाटत होते. कधीहि मी न पाहिलेल्या व्यक्ती देखील भेटायला येत होत्या येताना एक बिस्कीट पुडा हा बरोबर देखील आणत होत्या.


माझी आजी मुंबईला होती ,तिला धक्का बसेल म्हणून आठ दिवस तिला काही सांगितले नाही. मी स्वतः फोनवर बोललो आणि मग आजीला बोलावले. आजीही मला पाहून हादरली पण डोक्याला मार नाही हे पाहून आजीच्या मुखातून उद्गार बाहेर पडले ‘आई मळाबाईने वाचविले’ नकळत आजी रडायला लागली होती. एव्हढेच काय शेजारच्या बायकांना देखील मला पाहून अश्रू अनावर झाले नाही तेही आल्यानंतर एका प्रकारे माझ्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत होत्या.


 याहीपेक्षा सर्वात जास्त काळजाचा ठाव घेणारी गोष्ठ म्हणजे ८५ ते ९० वर्षाच्या म्हातार्या अनेक आजी काठी टेकतटेकत मला भेटायला आल्या होत्या त्यांच्याकडे पाहून मी खरच निशब्द झालो होतो. हे माझ्यावर असलेल्या प्रेमामुळे आले होते कि नाही माहित नाही परंतु माझ्या वडिलांवर करत असलेल्या प्रेमामुळे आले होते हे नक्की.


निसर्गाच्या कुशीत, मोकळ्या हवेत मी झटपट बरा होत होतो. परंतु माझे विचारचक्र कायम चालू असायचे, मी नकळत राहून राहून स्वतःलाच दोष देत होतो. रात्रभर झोप लागत नव्हती. पहाटे मंदिरात घंटानाद व्हायचा तो माझ्या बरोबर कानावर यायचा काकडा सुरु व्हायचा थोड्याच वेळात काही पक्षांची कुजबुजहि सुरु व्हायची आणि मला झोप तेव्हा लागायची हे दररोजचे सत्र झाले होते. नेहमीच १० रुपयाचा आंब्याचा ज्यूस पिणारा मी आठ दहा दिवस थेट अप्पल ज्यूस पीत होतो. कारण खाता काही येत नव्हते.

त्यानंतर पुन्हा डॉक्टरांकडे गेलो तपासणी केली, टाके काढले, व्यवस्थित ड्रेसिंग केली आणि तेव्हा चेहऱ्याकडे पहिले आणि बरे वाटले टाक्यांचे व्रण जास्त दिसत नव्हते, थोडेफार तर दिसणारच होते, डोक्याचे भलेमोठे टेंगुळ पूर्णपणे ओसरले होते, संपूर्ण काळा झालेला गाल व्यवस्थित झाला होता, दाताकडे पहिले तर दातही थोडासाच कट झाला होता. वेदना थोड्या होत्याच.

पुन्हा गावी जाऊन आता थोडेफार क्रिकेट पण खेळायला लागलो आहे. जखम व्यवस्थित भरून आली आहे. आता जवळजवळ पहिल्यासारखा झालो आहे.


म्हणतात ना,दैव जाणिले कुणी.........असो

माझ्या अत्यंत दुःखाच्या व वाईट परिस्थितीत आई मळावीदेचा आशीर्वाद , परमेश्वराची कृपा, लहान थोरांनी दिलेले प्रेमरूपी आशीर्वाद , कृशल टाइम मध्ये केलेली मदत यामुळेच इतक्या लवकर माझी तबियेत सुधारली आहे, जवळजवळ मी ९० टक्के बरा झालो आहे. सगळ्यांनीच केलेल्या सहकार्याचे मी ऋण फेडू शकत नाही परंतु शब्दरूपी आभार मानून थोडेसे उतराई होण्याचा प्रयत्न करतो.

गेली चारदिवसापासून पुण्यात आलो आहे बरेच काम बाकी होते ते संपवून व्यवस्थित मार्गी लाऊन पुन्हा आठवडाभर गावी जात आहे ,गावाच्या मोकळ्या हवेत लवकर ठणठनित होण्यासाठी.

आता
अपघातातून खूप काही शिकलो, समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन अजूनच बदलला, प्रेमाची, आपुलकीची व्याख्या बदलली. आता यात्रेला आई मळावीदेचा कृपाशीर्वाद घेऊन पुन्हा नेटाने जोशाने थोड्याश्या बदलेल्या जीवनाची नव्याने सुरुवात करायची म्हणतोय एक सुखी माणूस म्हणूस.......!





अपघाताच्या तीन दिवसानंतर