Pages

बुधवार, ८ मार्च, २०१७

माझे दहावीचे अविस्मरणीय क्षण.......!

माझे दहावीचे अविस्मरणीय क्षण.......!

काल सकाळी नेहमीप्रमाणे PMT बस ने जात होतो, खूप गर्दी होती, मला बसायला जागा काय मिळाली नाही मग समजले कि दहावीच्या परीक्षेची सुरुवात होत आहे.त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांची गर्दी होती ती.
सर्व विद्यार्थी परीक्षेच्या टेन्शनमुळे खूपच निराश दिसत होते परंतु त्यांच्या सोबतीला त्यांचे पालक कोणाची आई तर कोनाचे वडील असे चित्र होते.  परंतु आता आज संध्याकाळी अजिबात गर्दी नाही मग बसल्याबसल्या विचार आला कि इथ शहरामध्ये पालक किती मुलांची काळजी करतात ते..!  

माझा दहावीचा काळ मला आठवला... ते परीक्षेच्या गमतीजमती आठवत आहे....शाळेच्या त्या रम्य आठवणी आठवत आहेत...!
साधारण आठ वर्षापूर्वी माझ्या परीक्षेचा पहिला दिवस आठवला. इतरांपेक्षा खूप वेगळा होता.
खरतर फक्त परीक्षेचा काळ आणि त्याची आठवण इतकच लिहायचं हाच विचार होता  परंतु त्या दहावीच्या आठवणीच इतक्या आहेत कि थोडासा आढावा घ्यावा वाटला आणि त्यानंतर परीक्षेचा काळ वर्णन करावा वाटतो आहे.............!


खरतर आपल्याकडे दहावीला सर्वात जास्त महत्व आहे. जीवनाला कलाटणी देणार वर्ष म्हणून दहावीला समजल जाते. पालकांपासून ते विद्यार्थ्यापर्यंत त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन देखील थोडा वेगळा आहे.
मला माझे ते रम्य दिवस अजूनही आठवत आहेत. माझी शाळा होती श्री. रोकडेश्वर विद्यायल आंबी दुमाला, ता- संगमनेर जि- अहमदनगर. तिथ दहावीच्या वर्गाची स्पेशल खातरदारी घेतली जायची.

दहावीला गेल कि आम्हांला सुरु व्हायचे ते शाळेचे एक्ष्ट्रा तास. शाळा उघडायच्या अगोदरच १५ दिवस आमची शाळा चालू व्ह्यायची.    दहावीला वर्ग हि स्पेशल असायचा अगदी शाळेच्या ऑफिस ला लागुनच. त्याच कारण देखील तितकच भारी म्हणजे थोडी जरी बडबड गडबड गोधळ सुरु झाला तर लगेच समजेल आणि मग येऊन मुलांची धुलाई.

आणि याच बरोबर दुसर देखील त्याला कारण ते म्हणजे थोडा वेळ जरी एखादा शिक्षक वर्गात आला नाही तर लगेच दुसरे शिक्षक सहजगत्या येऊन शिकवण चालू करायचे म्हणजे मुलांना थोडाही मोकळा वेळ न देणे.
आमचा दहावीचा वर्ग थोडा छोटा होता आणि त्याट जरा अंधारही, परंतु पारंपारिक वर्ग होता तो, सगळ्यांचा त्या वर्गाकडे पाहण्याचा दृष्टीकोन खूप वेगळा असायचा. बाकी लहान वर्गाचे विद्यार्थी तर तिकडे फिरकत पण नसायचे.

नेहमीप्रमाणे मी पहिल्याच बेंचवर बसायला जागा घेतली. त्यात मी जरा बारीक आणि बर्यापैकी हुशार ( इतका नाही ) होतो त्यामुळ मला कुठेही बसवलं तरी नंतर पुढेच घ्यायचे.
दररोज सकाळी ७ वाजता आमच डेली रुटीन चालू ह्यायचे ते संध्याकाळी सहा वाजता घरी.
७ वाजता घरून निघणे ५ ते सहा किलोमीटर सायकलवरून प्रवास मग ८ वाजता इंग्रजीचा पहिला एक्ष्ट्रा तास त्यानंतर ९.३० ला गणिताचा तास आणि मग शाळा भरायची ते ५ वाजेपर्यंत. कधी – कधी नंतरही इंग्रजीचे तास व्हयाचे म्हणजे घरी जायला ६ वाजायचे.

सकाळी इंग्रजीचा तासाला खूप गंमत यायची. झावरे सरांना थोडा यायला उशीर झाला तर मुल खुश व्हायचे वाटायचे आज काय येत नाहीत परंतु ते यायचेच मग सगळे निराश. त्यामागे कारण देखील होत .
इंग्रजी सगळी डोक्यावरून जायची. Change the voice ,add question tag, direct – indirect हे असे सगळे व्याकरण पोरांची झोप उडवायची, तरी काही कधी शेवटपर्यंत कळल नाही .  तरी ते खूप भारी लहान होऊन हसी मजाक करून शिकवायचे. म्हणून कुठे तरी पास व्हायला मदत झाली.
शेलार सरांच्या मराठीच्या तासाला येणारी झोप. आणि त्यात माझा मित्र आणि मी त्यांच्या तासाला खात असलेलो लेमन गोळ्या.

शिकवन्या अगोदर धडा आम्हाला वाचायला सांगणे असो..सगळ अविस्मरणीय. फक्त धड्याचे नाव बदलून तोच तोच वर्गपाठ दाखवणे असो किंवा त्यांच्या  शिकवणी डेस्क अगदी आमच्या बेंचच्या समोर घेऊन त्याखाली वाकून जोक्स करणे असो सगळ आज आठवतंय.

विज्ञानचे शिक्षक कापूसकर सर आमचे क्लासटीचर होते. नेहमी त्यांचा पहिला तास असायचा. हुशार सर होते पण आम्हाला कधी त्यांनी शिकवलेले कळलेच नाही. त्यांच्या तासाला आम्ही वर्गपाठ पूर्ण करत असायचो. प्रश्न अगोदर लिहून आणायचो आणि ते जेव्हा हा महत्वाचा मुद्दा आहे लिहून घ्या म्हणायचे तेव्हा आम्ही ते उत्तराच्या ठिकाणी लिहायचो. एक प्रकारे त्यांना फस वायचोच म्हणा.

सगळ्यात भारी त्यांची गोष्ठ होती तीम्हणजे घरी राहिले कि application द्यायचे. मग आम्ही त्याचा खूप फायदा उठवायचो. घरी राहायचे असेल तर दुसर्याकडे आजारी असल्याचे अप्लिकेशन द्यायचे. सर पण खूप हळवे होते. थोड त्यांच्यासमोर रडल कि लगेच सोडून द्यायचे.

गणिताचे शेळके तर खूप पोटतिडकीने शिकवायचे पण आम्ही त्याचा गैरफायचा घेतला. त्यांनी त्यांचे काम सोपे व्हावे म्हणून पाच - सहा जरा हुशार जणांना तपासनीस बनविले म्हणजे जे कोणी दुसरे विद्यार्थी  गणितचा अभ्यास करतील त्यांचे चेक करायचे आता त्यात मीही होतो.

आणि आमच्या तपासणीसांचे चेक करायला एक मुलगी ठेवली होती. आता आम्ही कधी ते गणिते लिहीतच नव्हतो किंवा तसा अभ्यास करतच नव्हतो. त्यामुळे दाखवण्याचा त्या मुलीला प्रयत्न कधी आम्ही केलाच नाही तिला ही  वाटत असेल हे पण तपासनिस आहे त्यामुळे यांनी लिहले असेल यामुळे गणिताचा अभ्यास काय कधी जास्त झालाच नाही आणि त्याचा फटका परीक्षेत नक्की बसला.

रोकडेश्वर विद्यालय हे नाव घेतलं तर एक समीकरण होत आणि आहे ते म्हणजे मिंडे सर. आज शाळेतून शिकून गेलेला प्रत्येक विद्यार्थी या सरांचे नाव काढत नाही असे होणार नाही.
तसा मी या सरांचा लाडका विद्यार्थी होतो. हिंदी आणि इतिहास शिकवायचे.  अतिशय कडक शिस्त. सगळ्या शाळेत त्यांचा दरारा होता. एका नजरेत सर्व शाळा स्तब्ध करण्याची त्यांची ताकद होती. त्यांच्या तासाला एकदम सरळ बसायचे , नाकावर माशी जरी बसली तरी हालचाल नाही जांभळी तर मुळीच नाही. नुसतीच कडक शिस्त नव्हती तर शिकवण्याच्या बाबतीतहि तितकेच चांगले.

मुलांच्या कविता तर अर्थासकट पाठच असायच्या परंतु सगळे धढे सुद्धा तोंडपाठ असायचे आजही माझे हिंदीचे अनेक पराग्राफ तोंडपाठ आहेत. हि त्यांचीच किमया आहे.
हे झाले विषयांच्या शिक्षकांबद्दल परंतु कधी जर कुठे क्रिकेट खेळताना जरी दिसलो किंवा तशी त्यांना टीप जरी लागली तरी प्रार्थनेला काही खैर नसायची.

इंग्रजीची दर आठवड्याला होणारी टेस्ट आणि मग सर्वांपुढे बाहेर काढून पक्के बदाडून काढायचे हि तर अविस्मरणीय आठवण. त्याच वेळी इतर शिक्षक देखील हाच तो अजून माझ्या वाट्याचे दोन फटके मारा असे म्हणायचे तेही सगळी शाळा पुढे ग्राउंड मध्ये बसली असायची तेव्हा. खूप लाज वाटायची आणि वाईट पण वाटायचे.

म्हणजे एक गोष्ट नक्की आणि आमच्या पाचवीला पुजलेली असायची ती म्हणजे मार..मार..मार...आणि मारच.
परंतु  सगळ्यात महत्वाची गोष्ट हि होती कि कितीही मारले तरी घरी सांगता येत नव्हत आणि तसे केलं तर आणखीच मार पडायचा.
परंतु आता जरा परिस्थिती वेगळी झाली आहे असे माझे म्हणजे आहे. पालक नाजूक झाले आहे आणि तशी खंत देखील शिक्षकांनी व्यक्त करून दाखवली आहे.
दहावीला होतो तरी आमच्या शाळेत हाफ चड्डीच होती. जरा मोठे समजायचो आम्ही आम्हाला त्यामुळ खूप  लाज वाटायची.


कधी टाय फक्त प्रार्थनेपुरता फक्त बटनात अडकवून द्यायचो तर कधी बूट घातले नाही तर पायाला बँडेज बांधून मार वाचवायचो व्हा दहावीच्या गंमती. परंतु मिंडे सर जर चेक करायला असले कि सगळ बाजूला ठेऊन गप गुमान मार खाऊन घ्यायचा. कारण त्यांचे  काय सांगता येत नव्हते कधी बँडेज पट्टी काढायला लावतील आणि काय करतील.

PT चा तास सोडला तर आम्हाला कधी ground वर खेळायला किंवा कशालाच नेत नव्हते.  शनिवारी सकाळी PT चा तास असायचा त्या तासाला कवायती व्हायच्या, मी दहावीला असताना मला त्या तासाला   सगळ्या शाळेच्या पुढे सर्वांना गाईड करायला उभे करायचे. कधी कधी एखादा कवायत प्रकार मधेच हात वर करून थांबवून ठेवायचे त्यावेळी मला काय हालचाल करायला चान्स नसायचा सर्वात अवघड परिस्थिती तेव्हा व्हायची. अविस्मरणीय आठवण.

दहावीला असताना सहामाई परीक्षेत आम्हाला २० पैकी तोंडीचे मार्क्स होते परंतु ते आमच्या शिक्षकांनी मुद्दाम दिले नाही. कारण टक्केवारी कमी मिळावी आणि त्यातून मुल अभ्यास करावी.
तेव्हा तरीही मला ६५ टक्के मार्क्स होते ते ८० पैकीच म्हणा पण पूर्णपणे गोंधळाची अवस्था झाली होती कारण काहीच कळत नव्हते ते मार्क्स न दिल्यामुळे.

चौथा पाचवा नंबर आला असेल सहामाई परीक्षेत पण या घोळामुळ कोणाच्या निदर्शनास नाही आलो.
सगळ्यात भारी किस्सा तर असायचा दहावीचा फॉर्म भरण्याचा पहिले फोटोग्राफर कडून शाळेत फोटो काढायचे मग तो फॉर्म भरताना त्या सरांच्या सूचना ... अक्षर चौकटीच्या बाहेर गेल नाही पाहिजे आणि एखाद्याचे गेल तर लगेच त्याला मोकार मारायचे.
वेगळीच दुनिया होती ती.


सराव परीक्षा असायची. तोंडी परीक्षेचे मार्क्ससाठी डबल चाचणी परीक्षा व्हायची. विज्ञानाच्या प्रक्टिकल परीक्षेला आदल्या दिवशी सगळी सेटलमेंट होऊन कुणाचा मोठा प्रयोग कोणता आणि कोणाचा छोटा प्रयोग कोणता सगळ काही फिक्स असायचे. प्रयोगशाळेत दुर्बिणीखाली काही दिसत नसले तरी सर मला बोलवून म्हणायचे बघ काहीतरी हालचाल करत आहेत ते क्षुक्ष्मजिव आहेत मीही हा म्हणायचो खर तर मला काहीच त्याखाली दिसत नसायचे.

सिलॅबस तर कधीच संपवून व्यायचा मग चालू व्हायची सगळ्यांची रिव्हिजन.
परीक्षेच्या अगोदर प्रत्येक विषयाला बोलवायचे ते गेस्ट लेक्स्चर देणारे शिक्षक. त्यांचे मार्गदर्शन, बोर्डला पेपर कसा असतो, कसा लिहायचा, कुठ प्रश्न क्रमांक टाकायचा तर कुठ रेषा मारायच्या इतपर्यंत सांगितलं जायचे.
सर्वात जास्त आज हसू येणारी गोष्ठ म्हणजे पेन बदल्यावर वर पण सही घ्यावी असे सांगणे. आणि तसे आम्ही करयचो देखील.

आमच्या सेंडअप च्या दिवशी अनेक वर्षातून   ठेवलेली आमची गॅदरिंग आणि त्यावेळी आम्ही केलेली मजा आजही आठवते.
असो ................
शेवटी एक गोष्ठ नक्की होती कि सर्म्पूर्ण वर्षभर अगदी घासून पुसून हाणून मारून इतक तयार केलं होत कि विद्यार्थी हा परीक्षा देण्यासाठी परिपूर्ण झाला होता.
आता वेळ आली होती परीक्षेची.
.......................
प्रत्येकाच्या जीवनातील सर्वात मोठी परीक्षा म्हटले तरी हरकत नाही.
पहिल्यांदाच सामोरे जात होतो.माझ्याप्रमाणेच सर्वांच्याच मनात धाकधूक होती.
तसा बर्यापैकी अभ्यास झाला होता. परंतु घरातील सर्वाची माझ्या अभ्यासाप्रती आसक्ती असायची.
घरचे सर्व माझ्या अभ्यासात काही व्यत्येय येणार नाही याची काळजी घ्यायचे.  गायीचे दुध काढणे असो,किंवा घास कापणे , गायींना चारा घालणे हे कामे मी करायचो परंतु कुठलेही काम त्यावेळी करायला देत नव्हते. यांसारखे इतरही किरकोळ काम माझ्यासाठी तात्पुरते बंदच केले होते.

आजोबा त्यावेळी सप्ताहाला गेले होते त्यामुळे त्यांची खोली मला अभ्यासाला दिली होती. मग मी कुठेतरी बघितल्या प्रमाणे ज्या खाटेवर झोपायचो त्याच्या अगदी समोर भिंतीवर अभ्यासाचे थोडेफार रंगवले होते. एक वेळापत्रक तयार केले होते. ( परंतु ते कधी पाळले नाही ). भिंतीवर रेनुसुत्रे लिहिले होती ,संज्ञा होत्या , काही गणिताची सूत्रे अशी लिहून ठेवली होती जर कुणी आले तर वाटायला पाहिजे कि भरपूर अभ्यास चालू आहे असे.
आजही पहिल्या पेपरची गोष्ट आठवते, पहिल्या पेपरच्या अगोदरच्या दिवशी वडील कामाच्या निमित्ताने चार-पाच दिवस बाहेर गेले होते. दुसर्या दिवशी माझा मराठीचा पहिला पेपर होता.


आमची सामायिक विहीर आहे. त्या दिवशी आमची शेताला (कांद्याला ) पाणी भरायची बारी (वेळ ) होती. रात्री दोन वाजता लाईट येणार होती. त्यावेळी मोटार चालू करणे गरजेचे होते. आता वडील घरी नसल्यामुळे आईलाच हे सर्व कराव लागणार होत. तेव्हा आईला सोबती म्हणून मी रात्री दोन वाजता मोटार चालू करून पहाटे पाच वाजेपर्यंत आईला  पाणी भरू लागलो म्हनण्यापेक्षा वाफा भरला कि सांगायचे कि बारे द्या अस माझ काम होत.आणि त्याही पेक्षा सोबतीला होतो हे महत्वाच. तेव्हा बत्तीच्या वर आडवा डब्बा लावून बनवलेली एक बॅटरी  माझ्याकडे  आणि चार्जिंग ची बॅटरी  आईकडे होती हे आजची मला आठवतय.

पहाटे पाच वाजता घरी येऊन अंघोळवगेरे करून पुन्हा थोड वाचून लवकरच मित्राच्या गाडीवर बसून परीक्षा केंद्रावर आलो .
भरपूर सारे मुल बघून मी अधिकच डिप्रेशन मध्ये गेलो होतो. वेगळाच नजरा होता. गेटवर एकदा चेकिंग वर्गात गेल्यावर एकदा चेकिंग म्हणजे कॉपी करण खूपच अवघड आणि तसेही कॉपीचा आणि आपला कधी दूरदूर पर्यत सबंध नव्हता खूप घाबरायचो त्यामुळ खूप भयावह असे वातावरण म्हटले तरी हरकत नाही.
नंबर कुठे आहे हे पाहण्याची धावपळ तर आपल्या वर्गात आपल्या शाळेचे कोण आले आहे याची उत्कंठा. दोन चार चांगले पेन,वरून कंपास व्यवस्थित सगळ्या साहित्याने भरलेली त्याच्या सोबतीला पॅड म्हणजे अगदि पाकिस्तान वर सर्जिकल स्ट्राईक करायला जायचे आहे अशी पेपरची ती  तयारी.

उत्तर पत्रिका आल्यानंतर त्यात नंबर व्यवस्थित लिहणे असो किंवा मराठीच्या पेपर मध्ये आलेला माझ्या आवडाच्या विषयावर म्हणजेच पर्यावरण व निसर्गावर निबंध आजहि  आठवतोय. त्यात घरात पाणलोट क्षेत्राचे आणि पर्यावरणावर अनेक पुस्तके होती, तेही वाचलेली होती त्यामुळे त्यातील दोन कविताही लिहिल्या होत्या त्या आजही आठवतात.

‘हिरवे हिरवे शिवार सारे पिवळे पडून गेले
आभाळ पेलणारे सारे पक्षी उडून गेले
दुर्भाग्य या फुलाचे माळी असा मिळाला
वेळी तोडण्यास तो आज सिद्ध झाला’.
हि पेपर मध्ये लिहिलेली कविता आजही आजची स्मरणात आहे.

त्याहीपेक्षा पर्यवेक्षकांनी मागितलेले आय डी कार्ड आणि आम्ही दाखवलेले परीक्षेचे हॉलतिकीट याचा किस्साही आठवतो कारण आमच्या शाळेला आय डी कार्ड हे नव्हतेच आणि आम्हला आय डी कार्ड काय असते हे माहीतच नव्हते मी हॉलतिकीटलाच ते समजायचो. अशी माझी किंवा आमची  दुर्दशा .

पुढे जाऊन तरशेवटी उत्तरपत्रिकेवर लावलेला बारकोड आणि होलोग्राफ काय असते किंवा कशाला काय म्हणतात किंवा यातील फरक काय काहीच कळत नव्हते. फक्त सर्व भारी,नवल आणि काहीतरी वेगळ वाटायचं.
इतिहासाच्या पेपरला आमच्याच शाळेचे आलेले शिक्षक शेलार सर आणि त्यामुळे आनंदी झालेलो आम्ही कि आता आम्हाला सुट भेटणार एकमेकांचे पाहता येणार परंतु तसे काहीही न झाल्यामुळ आमचा झालेला भ्रमनिराश देखील आठवतो.

इंग्रजीच्या आणि गणिताच्या पेपर ला असलेले a.b.c.d  सिस्टीम त्यामुळ कोणत्या पेपर मध्ये काय याची पेपर झाल्यावर उत्सुकता किंवा भरारी पथक आणि स्कॉड आले हे दररोज चार वेळा कोणाकडून तरी ऐकायचो मात्र प्रत्यक्षात दर्शन मात्र त्यांचे कधी झाले नाही.
इंग्रजीचा एक पाठ केलेला निबंध तोच फिरवून फिरवून लिहिलेला असो किंवा त्याच पेपरला भाषांतर करा मध्ये टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचे नियम आलेले असताना झालेला आनंद असो कारण ते  सगळे नियम माहित होते इंग्रजी नाही आली तरी काही हरकत नव्हती.


घरी आल्यावर पेपर चेक करून काय चुकल काय बरोबर हे पाहणे असो किंवा  येत असूनही एखादे उत्तर चुकीचेच लिहिले गेल्यावर मनाला झालेला पश्चताप असो सगळ वास्तववादी होत.
त्या काळात जास्तकरून आमची tv बंद असायची   परंतु संध्याकाळी काही काळ घरचे चालू करायचे आणि मालिका पाहायचे. मला अभ्यासाला दुसरी खोली दिली होती परंतु माझ काही मन लागत नसायचे. मी निवांत कडी लावून झोपून घ्यायचो. जेवायच्या निमित्ताने भरपूर वेळ tv पाहायचो. तेव्हा ‘मेहेर’ हि मालिका असायची खूप हिट होती मलाही आवडायची म्हणून मी जेवणाचा बहाणा करून अर्धा तास मालिका पाहत जेवण करायचो हि सुद्धा एक न विसरता येण्याजोगी आठवण आहे.


पेपर ला जाताना एक दिवस मित्राची बंद पडलेली m-80 आणि मग परत दुसर्या मित्राच्या गाडीवर जाताना देखील त्याच्या सायलन्सर मधील पडलेली नळी आणि आम्हाला झालेला उशीर ,त्यात गेटवर न चेक करताच सोडलेला आनंद आणि खूप लेट झालो आहे याची भीती खूप त्रासदायक होती. अक्षराच्या बाबतीत तर कुत्र्याचे पाय मांजराला असे होते परंतु तरी हळूहळू लिहून अक्षरावर रेषाही न देता लिहिलेले पेपर आठवतात.
पेपर देऊन आल्यावर हुशार मुलांकडून उत्तरांची खात्री करून, याला त्याला हे लिहील का ते लिहील का हे विचारण्याची मजाहि  काही औरच होती.
शेवटच्या पेपरच्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदा चालवलेली मोटारसायकल हि अविस्मरणीय आहे.
परीक्षा संपल्यावर सर्वांच्या अगोदर लागलेल्या त्या सुट्ट्या आणि आता फक्त मजा करायची क्रिकेट खेळायचे ,पोहायचे याच स्वप्नात ,आनंदात डोक्यावरचे कमी झालेले ते कोवळ्या मनातले ओझ. याची कल्पना आज मितीला मीही करू शकत नाही कारण ते खूप सुखदायक होत.


म्हनजेच  सर्वात महत्वाचे वर्ष एका प्रकारे लीलया पेलले याची ती अनुभूती असावी.
बर्याच दिवसाच्या सुट्ट्यांनंतर दहावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली.  सर्वजन टेन्शनमध्ये यायला लागेल ....नक्की काय होईल त्या मनाचा आता विचार आपण करू शकत नाही.
निकालाचा दिवस आला. सकाळी ११ वाजता online जाहीर होणार होता. त्याच दिवशी दुपारी शाळेत तो मिळायचा कारण श्रीरामपूर या विभागीय कार्यालयातून हार्डकॉपी येत असल्यामूळ थोडा शाळेत निकाल यायला वेळ लागायचा.
आदल्या दिवशीच दोन तीन  नातेवाईकांची सीट नंबर मागून घेतला होता.
सकाळीच निकाल पाहायला बोट्याला (जवळच गाव ) गेलो. तिथ दोन ठिकाणी १० रुपयाला निकाल सांगायचे.
मी वडिलांचा फोन बरोबर आणला होता. आत्याच्या मुलाला निकाल बघायला सांगितला होता. ११ वाजता निकाल लागला, निकाल पाहायला भरपूर गर्दी तिथे होती ,माझे अनेक मित्रही होते. परंतु सर्वर डाऊन झाला होता त्यामुळे अधिकच वेळ लागत होता.


आम्ही मित्रमंडळी निकाल पाहायला त्या नेटवाल्यासमोर उभे होतो. मनात प्रचंड धाकधूक होती. जर कुणी विचारले तर ८० टक्के मार्क्स मिळतील असे मी संगायचो परंतु त्याची मला खात्री देता येत नव्हती. हळूहळू निकाल समजायला लागले. परंतु माझा नंबर काही लागला नव्हता.
तेव्हड्यात आत्याच्या मुलाचा फोन आला. मी फोन उचलला. तो बोलला किती मार्क्स पडले असतील ?
मी बोललो नक्की नाहि सांगता यायचे किती ते ...!

मनातून खूप घाबरलो होतो. छाती धड धड करायला लागली होती.
उत्सुकता शिगेला पोहचली होती.
त्याने विचारले तरी किती?
मी थरथरच उत्तरलो ऐंशीच्या आसपास पडायला पाहिजे....!
तो बोलला एक काम कार आधी पेढे घे पेढे....
पंच्याऐशी (८५) टक्के मार्क्स मिळाले आहेत.
मला विश्वास बसत नव्हता.

मी त्याला परत नाव व्यवस्थित चेक करायला सांगितले. तरी तो होच बोलला.
परंतु म्हणतात ना कानात आणि डोळ्यात चार बोटाचे अंतर असते त्यामुळे विश्वास पाहिल्यावरच होईल.
काही वेळ थांबलो आणि शेवटी प्रिंट काढून पाहिले. खरच ८५.६९ टक्के मार्क्स मिळाले होते.
मला विश्वास बसत नव्हता सगळा निकाल व्यवस्थित दोन वेळा चेक केला आणि मी थोडा स्थिरावलो मला विश्वास बसला. माझा आनंद गगनात मावत नव्हता. लगेच देवाला हात जोडले देवाचे आभार मानले कारण खूप मार्क्स पडले होते. अपेक्षेपेक्षाहि जास्त. मी खूप खुश होतो ,इतरांना किती आहे किंवा किती नाही याचा विचारही नव्हता.
माझ मन सैर भैर धावत होत. मी माझ्यामधेच खूप खुश होतो.


थोडा वेळानंतर इतर माझ्या मित्रांना त्यांचे मार्क्स विचारू लागलो. थोडे माझ्यापेक्षा कमी होते परंतु कमी जास्त असा काही भेदभाव मी करत नव्हतो कारण मी माझ्या मार्क्समध्ये खूप आनंदी होतो.
माझ्यासोबत जे नव्हते त्यांना जास्त असतील हे मी समजून गेलो.
परंतु काही काळानंतर तू पहिला आला आहेस ,शाळेतून समजल आहे हे कळल. मला हि चेष्टाच वाटली. परंतु खात्री केली. मला तर विश्वासच बसत नव्हता.आनंद ओसांडून वाहत होता.
आतापर्यंत सहावा सातवा येणारा मी डायरेक्ट पहिला कसा हा प्रश्न मलाही पडला होता. जरा वेगळ वाटत होत. आश्चर्याचा धक्का बसला होता. परंतु हे सगळ खर होत.

परंतु आज एक गोष्ठ सांगतो या गोष्टीमुळे जे इतर नेहमी हुशार आणि  नंबरमध्ये येणारे मात्र खूप नाखूष होते. त्यांच्या मनात एकच गोष्ट असावी कि सगळ ठीक आहे परंतु हा मुलगा डायरेक्ट पुढे जाने कस शक्य आहे आणि ते त्यांच्या मनाला पटण्याजोगे नव्ह्ते.
प्रत्येक जन मला मनातून शिव्या घालत होता हे मी आजही जाणतो. अनेक जन अक्षर: नंबर गेला म्हणून रडले देखील ..... स्वाभाविक आहे त्यांचे रडणे देखील. परंतु माझा आनंद मात्र वेगळाच होता. कधीही न व्यक्त करण्याजोगा. 

दुपारी शाळेत बोलवलं माझा सर्व मुलांपुढे सत्कार झाला, त्यावेळी सरांनी बोलेलेल एक वाक्य कि आम्ही नेहमी शेजारील गावातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देत असतो थोडस मिश्कील होऊन होत पण ते आठवतंय अजूनही.
संध्याकाळी वडील माझा निकाल आणण्यासाठी शाळेत आले त्यावेळी एका शिक्षकांनी नकळत एक वाक्य बोलले ते माझ्या अजूनही स्मरणात आहे कि “शुद्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी “ आणि यापेक्षा दुसरी शाबासकी आपल्या पालकांना काय असू शकते . किंवा काय पाहिजे.
प्रत्येकाच्या घरच्यांसाठी यश काय असते तर पहिला नंबर येणे यापलीकडे तरी नसेल असे मी मानतो. आणि माझ्या घरच्यांच्या बाबतीत तर इतके  चांगले मार्क्स पडले हेच खूप मोठ होत. आणि त्यामुळे त्यांचा आनंददेखील खूप होता.


त्या आठवणी रम्य होत्या.  मी आवर्जून त्या नंबर न येणाऱ्या माझ्या मित्र – मैत्रीणीना सांगतो कि, तुम्ही हुशार होताच, मी तुम्हाला माझ्यापेक्षा सरसच मानतो तुमची हुशारीही मी नाकारली नव्हती आणि अजूनही नाही, माझ्यामुळे तुम्हा सर्वांना झालेला मानसिक ताण याचीही मी कल्पना करू शकतो आणि मोठ्या मनाने  त्याबद्दल माफीही मागतो.
परंतु एक गोष्ठ आवर्जून सांगतो कि मी कुठल्याही फळाची अपेक्षा न करून प्रामाणिकपणे  कर्म केले होते आणि त्याचे फळ नशिबाने आणि विधात्याने मला दिले असावे.
तुम्ही हुशारीत पुढे होताच परंतु थोडस नशिबात मागे पडला असावा अस मला वाटत.
असो ....
ते दहावीचे वर्ष .....ती दहावीची परीक्षा ..... आणि तो दहावीचा निकाल खरच माझ्यासाठी एक आत्मविश्वास वाढवणारा टर्निंग पॉंइंट ठरला असावा असे मी मानतो.

त्या वर्षामुळ ,त्या निकालामुळ मी माझ्याच मनात असलेल्या न्यूनगंडला कदाचित बाहेर काढल असाव. मला सायन्सहि पेलवल कि नाही अशी शंका होती परंतु त्याच त्या क्षणाने प्रवाहात आत्मविश्वासाने वाहत राहिलो आणि आधी डिप्लोमा मग B.E. डिग्री आणि आता सर्व काही मॅनेज करून, पार्ट टाइम अभ्यास करून फायनल  M.E. मास्टर डिग्री त्याच जोरावर मनोबल उंच करून पेलावत आहे.  आणि यात त्या दहावीच्या वर्षाची भूमिका  आणि तेव्हा मिळालेला विश्वास प्रेरणादायी ठरत आहे किंवा महत्वाची भूमिका बजावत आहे असे मी तरी मानतो. 
ते दिवस पुन्हा यायला हवे असे मला नेहमी वाटते, ते कधी न बोललेले मूल आणि मुली तरी आज त्यांच्यात असलेली आपुलकी , ते क्रिकेट खेळण,पोहणे आणि मग त्यावरून खाल्लेला सरांचा मार, सायकलवरून फिरणे ,दुसर्याला डबलशीट घेऊन जाण्यातला आनंद, एकट्यानेच कोणालाही न देता खाल्लेल्या गोळ्या, फोन आणि तसा प्रकारच्या डिजिटल गोष्टींचा दूरदूर पण सबंध नसताना घेतलेला जीवनाचा आनंद किंवा ती भूतकाळात केलेली मजा आज हवीहवीशी वाटते.


खरतर तेव्हाच यशच प्रत्येकाच्या बाततीत सगळ असते अशीही गोष्ट नाही. प्रत्येकाचे मार्ग ठरलेले असतात. तेव्हा मार्क्सनी यशस्वी झालेला जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होईलच असेही नाही किंवा तेव्हा मार्क्सच्या लढाईत हरलेला आता जीवनाच्या लढाईत हरेल असेही नाही.

फक्त प्रत्येकाच्या आयुष्यातील ते काही आठवणीचे रम्य दिवस असतात जे कि आपल्याला सुख,दु:ख,आनंद,प्रेम,प्रेरणा,आपुलकी,जिव्हाळा............., सगळ काही देऊन जातात.
आणि माझ्याप्रमाणेच प्रत्येकजनच ते दिवस आठवण्याचा प्रयत्न करत असतो किंवा आहे आणि प्रत्येकाने तो करावा देखील असे माझे मत आहे कारण त्या भूतकाळाच्या गोष्टीत रमून खरे आनंदअश्रू आणि दुख:श्रू नक्की काय आहे....? याची खरी जाणीवहि  तेव्हाच होते.

शेवटी एका निवांत ठिकाणी बसून गालावर ओंगळवाणे अश्रू घरंगळत मीही आठवतोय ते सगळ....ते मित्र......,ते दिवस.....,ते क्षण................रम्य...................आठवणी................! 

✍गणेश सातकर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा