Pages

बुधवार, २९ मार्च, २०१७

आजाराची कणकण आणि घरचे प्रेम

#आजाराची_कणकण_आणि_घरचे_प्रेम

मागचे तीन चार दिवस जरा नाशिकला गेलो होतो.(24, 25,26 मार्च)  दोन दिवस सीपीजिकॉन कॉन्फेरंस होती, ते थोड काम  आणि त्याच अनुषंगाने रविवारी तिसर्या दिवशी जरा नाशिक दर्शन घेतले. यायला सोमवारची पहाट उजडली जवळजवळ पाच वाजले. त्यामुळे त्या तीन चार दिवसात खूप धकधक झाली. परत सोमवारी झोप न होताच परत प्रोजेक्टचे काम त्यामुळे संध्याकाळी खूप कणकण जाणवायला लागली. अर्थात थोडीशी झोपेची आणि आरामाची गरज होती म्हणा.

दुसर्या दिवशी गुडीपाडवा होता, म्हणून घरच्यांनी फोन केला नेहमीची विचारपूस केली परंतु माझा थोडासा बदललेला आवाज ऐकून त्यांनी लगेच ओळखले कि जरा आजारी पडलो आहे म्हणून. त्यावरूनच थोड....

आजही आजारी पडलो म्हणजे आई वडिलांची आणि आजीची  आठवण येते..त्यांच्या नुसत्या जवळ असण्याने का कुणास ठाऊक भक्कम आधार होतो.. ते गावी असतात, परंतु  नुसता आवाजात झालेल्या बदलावरून आई फोनवर म्हणते, ' दवाखान्यात जाऊन ये बाळा ' (नेटवर्क प्रोब्लेममुळे फोन नेहमी लाउडस्पीकर वरच असतो)  आणि तिथेच जवळ असलेले वडील म्हणतात त्याला म्हणावं डॉक्टर कडे जा, चांगल तपासून घे, पैशाक नको पाहत बसू जाऊदे गेले तर.  त्याच वेळी आझ्या आजीला कळल्यावर आजी लगेच म्हणते त्याला म्हनाव अंगावर दुखन काढू नको, सवय आहे त्याला ,तसा आजारी पडत नाही पण  मग एकदा आजारी पडला म्हणजे तो लवकर उठत नाही..आणि जरा पोटभर खात जा म्हणाव...

आजारी असलो म्हणजे दिवसातून दोन तीन वेळा त्यांच्याकडून फोनवर विचारपूस होतेच, मग भलेही नॉर्मल काहीहि झाले असेल तरी. त्यामुळे मी कधी आजारी असलो तरी घरी सांगत नाही उगाच नको काळजी यामुळे. परंतु त्यांना असे समजल्यावर ते मात्र काळजीत असतात.

सहज मनात एक प्रश्न डोकावतो, आईवडील आजारी असले म्हणजे आपण इकडे काळजी करू नये म्हणुन कधीच आपल्याला सांगतही नाहीत. कधी फोनवर तस जाणवू देत नाहीत. सहज कुठल्यातरी मित्राकडून कळतं की अरे आज "मामी आणि दादा " दवाखान्यात दिसले होते, तब्येत बरी नाही काय? ..
या त्यांच्या प्रश्नावर आपणच गोंधळून जातो. कॉल केल्यावर सांगतात, विशेष काहीच नाही अंग जरा कणकण करत होतं म्हणून डाॅक्टरांना दाखवून घ्यावं म्हंटल, इतकच्. 
अन आपण बसतो टिचभर दुःख त्यांच्याजवळ इवळत.......!

माझ्या मते माझ्यासारख्या अनेकांच्या बाबतीत हीच अवस्था असेल. कदाचित एक संभ्रमअवस्थाच म्हणा ना.

शेवटी ती आपल्या घरच्यांची आपल्याप्रती एक आपुलकी असते आणि निर्मळ , सोज्वळ प्रेम असते कुठेही न मिळनेजोगे.......!

✍🏻 गणेश सातकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा