Pages

मंगळवार, ७ मार्च, २०१७

सुखी माणूस (कविता)

सत्य परिस्थतीवर आधारित मुक्तछंद प्रकारातील कविता लिहण्याचा एक छोटासा प्रयत्न.....!

सुखी माणूस.......! (शीर्षक)

ते वैभव, ती संपत्ती त्यानं स्वता:च्या बाहुच्या बळावर आणि सामर्थ्यावर कमावली होती,
पण आज तेच बाहू अशक्त बनले होते ,लाचार बनले होते .

म्हणूच ,मस्तकात कडाडत होत्या असंख्य-वेदना,
काळजात ढनाणत होत्या भयानक ज्वाला-अपमानाच्या.

तरीही तो अजून जिवंत होता, सजीवच होता,
कदाचित पुढील अपमानित जीवन जगण्यासाठी.

हा क्षण पहा......

दुपार टळून गेली होती,पोटात भुकेचा डोंब उसळला होता
म्हणून भीत-भीतच त्यानं साद घातली- सुनेला.

फनफनत  ती बाहेर आली- एक ताट घेऊन,
त्यावेळीच दरवाजात आला एक कुत्रा – भू भू करत .

त्या ताटातील एक तुकडा तिनं कुत्र्यापुढे फिरकवला आणि
तिच्या मुखातून एक शब्द बाहेर पडला – हाड .

कुत्रा तुकडा घेऊन पळाला आणि तिनं ते ताट  त्याच्यापुढे आदळलं ,
त्याहीवेळी तिच्या मुखातून एक शब्द बाहेर पडला – हुं...........!

पण त्या हुं......! मध्ये होती हाड.... या शब्दाची समानता .

ती गेली त्यानं त्या ताटाकडे पहिले- खिन्नतेने ,विषन्नतेने.

त्याचवेळी दरवाजात आला एक भिकारी बाहू पुढे करत,
तो उठला ते ताट तसेच त्याने भिकार्याच्या स्वाधीन केलं.

एक देवमाणूस असं दुवा देत भिकारी पाठमोरी वळला,
आणि तो त्या भिकार्याकडे एकसारखे पाहत राहिला .

एक सुखी माणूस या दृष्टीने...... एक सुखी माणूस या दृष्टीने.................!  
  

                               - ग.दि.सातकर (गदिसा)

------------------------------------------------------------------

वरील कविता रक सत्य परिस्थितीचे एका काल्पनिकदृष्ट्या केलेलं वर्णन आहे.

-------------------------------------------------------------------

तात्पर्य :

सांगायचे तात्पर्य हेच कि दिवसाची पोटाची भ्रांत असलेला एक साधा भिकारी देखील स्वाभिमानाने भिक मागून एक आनंदी आणि सुखी जीवन जगत आहे पंरतु आयुष्यभर काबाडकष्ट करून इतकी सारी संपत्ती कमवून देखील आज हात पाय थकल्यावर म्हातारपणी आपल्याच माणसांकडून लाचारीच आणि हाल अपेष्टांचे जीवन जगावे लागत आहे आणि तसे जीवन जगावं लागण यापेक्षा दुसर दुर्दैव माझ्या मते काही नसाव.

मग यापेक्षा एक भिकारी अशा व्यक्तीहून सुखी आहे असे मी मानतो.

                                        - गणेश सातकर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा