Pages

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०१६

आठवणी बाबांच्या.....!

ज्यांच्या अंगाखांद्यावर बसून,खेळून लहानाचे मोठे झालो, ज्यांनी माझ्या प्रत्येक पावलोपावली सावलीसारखे माझ्यावर संस्कार केले, ज्यांच्या कर्तुत्वाची प्रेरणा घेऊन आजपर्यंत न अडखळता चालत राहिलो आणि ज्यांच्या मायेच्या छायेत मी घडलो ते म्हणजे माझे आजोबा (बाबा) वै.ह.भ.प. सबाजी बबन सातकर.
आज त्यांच्याबद्दल बोलतोय कारण काही दिवसांपूर्वी त्यांची अचानक एक्झिट इतरांप्रमाणे माझ्या मनाला खूप चटका लाऊन गेली.

माझ्यावर अमाप प्रेम करणाऱ्या माझ्या आणि बाबांच्या अनेक आठवणी आज मनातून बाहेर येत आहेत.
कुटुंबापेक्षाहि समाजाहित आणि समाजावर प्रेम करण्याची वृत्ती त्यांची होती. आणि तेच संस्कार आमच्या संपूर्ण कुटुंबावर आणि माझ्यावर त्यांनी केले.
लहानपणापासूनच त्यांचे माझ्यावर खूप प्रेम. त्यांच्याच हाताला पकडून बालवाडीत जायचो . ते जितक्यावेळ असेतील तितकाच वेळ मी तिथे थांबायचो आणि पुन्हा ते निघताच परत यायचो.
बाबा कुठे बाजारला जात असतील तर त्यांच्या मागे सायकलवर बसून ते आवर्जून मला नेत असत. झेंडूची फुले विकायला जाताना किंवा मला डॉक्टर कडे घेऊन जाताना पुढे सायकलच्या नळीवरबसून जाण्याची गम्मत काही औरच होती. आणि त्यातूनच त्यांनी कॅरेजला धरून मला शिकवलेली सायकल आजही माझ्या स्मरणात आहे.
कुळवावर बसून त्यांच्यासोबत शेतीच्या कामाची माहिती घेता घेता शेतीची नांगर धरण्यापासून, ते पेरणीच्या वेळी शेवटच्या दोन पाभारीदेऊन  सगळी कामे अतिशय सफाईदारपने आणि अतिशय गोडी लाऊन त्यांनी शिकवलेल्या अनेक गोष्ठी आजही आठवतात. मला ते आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायचे.

त्यांचे कर्तुत्वच खूप काही मला सांगून जात होते. आधात्म आणि समाज हे त्यांचे पहिलं प्रेम. समाजाच्या प्रत्येक कार्यात त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा मग गावातील अखंड हरीनाम सप्ताह असो किंवा अन्य इतर गावातील कार्यक्रम असो.
आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी वारकरी साम्प्रदायचा प्रचार आणि प्रसारासाठी खर्च केला. पंचक्रोशीत काकडा अभंगचा महारथी म्हणूनच त्यांची ओळख होती.
याच त्यांच्या कार्याची दखल थेट महाराष्ट्र शासनाणे देखील घेतली आणि त्यांचा सन्मान करून अध्यात्म क्षेत्रात भरीव कार्याबद्दल संपूर्ण पठारभागात शंकर महाराजांनंतर ते एकमेव व्यक्ती होते कि ज्यांना पेन्शनरुपी मानधन चालू केले गेले होते.

गावातील पंढरपूर वारी असो, त्रंबकेश्वर वारी असो वा आळंदी वारी असो त्यांचा या नियोजनात नेहमीच पुढाकार असायचा. त्यांच्या नेतृत्वाखाली या वारी संपन्न करायचे. एव्हढेच नाही तर आज म्हसवंडीच्या प्रत्येक वारकर्याची  पंढरपूरमध्ये गैरसोय होऊ नये म्हणून गावची तिथे एक नवीन प्रशस्त खोली घेण्यात बाबांचा मोलाचा वाटा होता. गव्हाळा डोंगराचा रस्ता जवळपास पंच्याहत्तर टक्के रक्कम खर्च करून त्यांनी करून घेण्यात मोठा वाटा आहे.

आताही चालू असलेल्या कार्तिक स्नान काकड्याचे रंग रूप बदलून अनेकांना याची गोडी लागेल असे आकर्षक करण्यात त्यांचे मोठे योगदान . त्यांची एक्झिटहि कशी व्हावी तर नेहमीप्रमाणे काकड्याला निघत असताना थोडस अस्वस्थ जाणवले थोडसं जाळाची उब घेतली आणि उब घेता घेताच पांडुरंगाच बोलावण आल.

मला नेहमीच ते अध्यात्माची शिकवत देत राहिले. आळंदी पंढरपूर याची देही याची डोळा पाहण्यासाठी खास गर्दी नसताना परंतु कार्तिकी यात्रेला ते मला नेत असत. आपला नातू बुवा व्हावा हे त्यांची खूप मोठी अपेक्षा होती. चौथी नंतर त्याचप्रमाणे  सातवीनंतर त्यांचा नेहमी वारकरी शिक्षण संस्थेत मला दाखल करण्याचा हट्टहास असायचा. परंतु त्यांचे दुर्दैव आणि माझेची दुर्दैव वा सुदैव मला कुठल्याना कुठल्या कारणास्तव तिथे जाण्याचे टळत राहिले.

माझे त्यांना खूप कौतुक असायचे संपूर्ण गावात माझ्या कौतुकाचा पाढा असायचा कुठलीही छोटी किंवा मोठी गोष्ठ मी केली तर अभिमानाने सर्वांना सांगायचे.

घरी कोणताही पाहुणा आला कि काही वेळातच समोरच अडकवलेले माझे मेडल दाखवून माझे कौतुक सांगायचे ‘ आमचे पॉर लय हुशार आहे दहावीला त्याचा शाळेत पहिला नंबर आला, गवोरमेंट कडून त्याचा नंबर लागला डीक्लोमाला मीच अडमिशन घेऊन दिले कालेजमध्ये लय बक्षीस मिळवली त्याने.
माझ्या प्रत्येक निकालाचा उल्लेख ते गावातील अनेक लोकांना सांगून माझे कौतुक करून करायचे.
जेव्हा डिग्रीमध्ये चांगले मार्क्स घेऊन पास झालो तर बाबा संर्वांना सांगायचा कि आमच पोर इंजीनिअर झालं. पुढे कामाला लागलो तर बाबांनी सगळ्यांना माझ्याबद्दल सांगायचा. काही दिवसांनतर तर मी पुढचे शिक्षण घेतो आहे हे सांगितल्यावर तर सगळ्यांना बाबा सांगायचा कि आमच पॉर डबल ग्रजुएट होत आहे. लय हुशार आहे. जितके कौतुक करायचा तितकेच प्रेमदेखील. कधी घरी यायचो असेल तर प्रत्येक तासाला बाबा घरच्यांना मला फोन करण्यासाठी सांगत असे.

अनेकांचे लग्न जमवण्याचा बाबांचा खूप मोठा हातखंडा होता. अनेक लग्न त्यांनी जमवून दिली परंतु अनेक ठिकाणी बोलून दाखवलेली इतर पारंपारिक रूढी परंपरेचा पगडा असणार्या व्यक्तींप्रमाणे थाटामाटात नातवाचे लग्नाची त्यांची इच्छा मात्र त्यांची अपूर्ण राहिली.

म्हसवंडीतील वारकरी सांप्रदायाची भिंत बाबांच्या रूपाने कोसळली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही आणि ती काधिहि न उभी राहण्याजोगी आहे. आमच्या सातकर कुटुंबाचा तर पायाच कोसळला आहे. आज एकमेव असणार्या सातकर परिवाराचा म्हसवंडीच्या विकासात जो काही बहुमोलाचा असा खारीचा वाटा आहे किंवा पंचक्रोशीत जे काही मानाचे स्थान आहे त्याचे संपूर्ण श्रेय हे बाबांना आहे.
 
   माझ्या जीवनघडणीत तर बाबांचा खूप मोठा वाटा आहे. आज बाबा जरी नसले तरी जेव्हा जेव्हा त्यांची मला आठवण येईल तेव्हा अश्रुंबरोबर त्यांचे जीवन नेहमीच मला प्रेरणा देईल यात काही शंका नाही.

दोन ओळी बाबांसाठी......  

तुम्ही होता जेव्हा इथे ...तेव्हा नव्हते काही उणे,
आता गेलात दूरदेशी... मन हे झाले उदासवाणे.

नयनी पूर आसवांचा... खरी संपली सावली,
तुमच्या कर्तुत्व कलेचा... येतो आठव पाऊली.

कसा नियतीचा खेळ... केले पोरके आम्हाला,
आम्ही तुमची लेकरे... कसे विसरू तुम्हाला.

शब्दसुमने चरणी ... दाटलेल्या कंठातूनी,
वाहतो हि श्रद्धांजली... आम्ही विनम्र होऊनी.

परमेश्वरा तुजला रे... करतो एकच विनंती,
आमच्या सद्गुणी बाबांना... प्राप्त होऊ दे सदगती........!