Pages

बुधवार, २८ ऑगस्ट, २०१९

अहमदनगर जिल्ह्याचे नंदनवन काश्मिर...म्हसवंडी...!




      संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी परिसर म्हणजे निसर्गाने दोन्ही हातांनी उधळलेल्या अनुपम सौन्दर्यांचे जणू एक शिल्पच म्हणावे लागेल. सह्याद्रीच्या कुशीत, दोन जिल्हे ( पुणे, अहमदनगर ) आणि तीन तालुक्यांच्या ( संगमनेर, जुन्नर, अकोले ) सरहद्दीवर वसलेले, तीनशे उंबरठा असणारं म्हसवंडी हे छोटंसं गाव. 

आज एक विकसनशील गाव म्हणून संगमनेर तालुक्‍यातील म्हसवंडीची ओळख आहे.

      परंतु एके काळी छान असलेले गावाचे जंगल लुटलं आणि गावाला पाण्यासाठी वणवण करावी लागली. पंचवीस वर्षापूर्वी त्यावर उपाय म्हणून इंडो-जर्मन पाणलोट विकास कार्यक्रम अंतर्गत, हरमन फादर बाकर यांच्या नेतृत्वाखाली आणि ‘वॉटर' संस्थेच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हयातील पहिला यशस्वी पाणलोट प्रकल्प राबविण्यात आला आणि या पाणलोट उपचारांमुळे दुष्काळाचे हे चित्र बदललं. गाव विकासासाठी कास धरून पुढे जाऊ लागला.

दरम्यानच्या काळात पाण्याच्या क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात प्रथम क्रमांकाचा जल आकार पुरस्कार देखील मिळाला. त्यानंतर अनेक क्षेत्रात गावाने उल्लेखनीय कार्य केले. त्यात बचत गटांच्या माध्यमातून महिला सबलीकरण असो किंवा पर्यावरण पूरक वृक्षलागवड आणि संवर्धन असो, वनसंवर्धन असो तथा निसर्ग अधिक बहरावा त्यातून पर्यावरण अधिक संतुलित राहावे म्हणून कुऱ्हाडबंदी, चराई बंदी, बोअरवेल बंदी अशा नियमावल्या असो. या सर्वच गोष्टींचा गावाला खूप फायदा झाला. आणि त्यामुळे मागील दोन दशके हा परिसर अतिशय निसर्गरम्य आणि पहिलेच म्हटल्याप्रमाणे निसर्गाने दोन्ही हातांनी उधळलेल्या अनुपम सौन्दर्यांचे जणू एक शिल्पच झाले आहे.
    परंतु खंत या एका गोष्टीची देखील आहे कि आमच्याकडे इतके निसर्ग सौदर्य आहे हे आम्ही सांगायला कमी पडलो.  फक्त हेच नाही तर गावाने केलेल्या अनेक गोष्ठी ज्या खरच प्रेरणादायी आहेत त्याही आमच्या माध्यामातून सांगायला कमी पडलो.

     WOTR संस्थेमुळे पाणी आणि पाणलोट क्षेत्र विषयाचा अभ्यास करण्यासाठी भारताच्या प्रत्येक राज्यातील एक हजारच्या वर टीम येऊन गेल्या. एव्हढेच नाही तर जगभरातील ४८ पेक्षा जास्त देशांच्या अभ्यासकांनी भेटी दिल्या. तथा जानकीदेवी बजाज संस्थेच्या २००+ पेक्षा जास्त गावांना, बायफ संस्थेच्या १५०+ गावांना तर पानी फाउंडेशन स्पर्धेत सहभागी ५०० पेक्षा जास्त गावांना म्हसवंडीने  पानलोटाचे प्रशिक्षण दिले आहे.

     हे सर्व असताना देखील सर्वसामान्य लोकांना देखील गावची, निसर्गाची माहिती व्हावी आणि ती पर्यटनाच्या दृष्टीने इतरांपर्यत पोहचावी हा आमचा इथून पुढच्या काळातला उद्देश आहे. 
 हळूहळू आणि या गोष्टी लोकांपर्यत पोहचवण्यात यशस्वी देखील होत आहोत. याचाच परिणाम म्हणून का होईना आताच भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थेच्या एका शॉर्ट फिल्मचे चित्रीकरण देखील येथे पार पडले आहे.

अनेक छायाचित्रकार देखील या परिसराला भेट देण्यासाठी येत आहेत आणि ते देखील या निसर्गाचे कौतुक करून याला काश्मीरची उपमा देत आहेत.
  
याच परिसराचे काही फोटो आपल्यासाठी....! 
एकदा अवश्य भेट द्या.

सर्व फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

( फोटो सौजन्य :- उमेश थोरात , सागर बोडके )







































रविवार, ४ ऑगस्ट, २०१९

पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम..!

पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम….!
माती अडवा आणि पाणी जिरवा हा साधा आणि सोपा परंतु मूलभूत मंत्र म्हसवंडी गावाने २५ वर्षांपूर्वीच अमलात आणला….!
त्या काळात ह्या श्रमदानाच्या गोष्टी लोकांच्या गळी उतरवणं किती अवघड असेल याची कल्पना तुम्हीच करा.
पाणलोट प्रकल्पावर संपूर्ण तंत्रशुद्ध वैज्ञानिक दृष्टया अभ्यास केलेल्या WOTR- Watershed Organisation Trust या इंडो- जर्मन पाणलोट प्रकल्पा अंतर्गत तयार झालेल्या हरमन फादर भाकर यांच्या नवोदित संस्थेने १९९४ साली भारतात आपले पहिले ५० पायलट प्रोजेक्ट राबिवले त्यात म्हसवंडी गावाचा सहभाग होता.
गावात नवीनच अश्या प्रकारचे काम करण्यात येत होतं आणि त्याला साथ मिळाली संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याची Sahakarmaharshi Bhausaheb Thorat SSK Ltd Amrutnagar Sangamner आणि Nabard बँकची. आणि या पहिल्या पायलट प्रोजेक्टमध्ये जी चार ते पाच गाव यशस्वी झाले त्यात म्हसवंडी गाव हे अग्रगण्य होते.
पंधरा वर्षापूर्वी पुन्हा एकदा गावाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वर्गीय आर आर पाटील ( तत्कालीन उपमुख्यमंत्री ) यांनी महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा जल आकार पुरस्कार देऊन सन्मानित केलं..
यानंतर म्हसवंडी गाव हे WOTR संस्थेसाठी मॉडेल गाव झाल.
अनेक अभ्यास त्यानंतर या प्रकल्पावर होत गेले गावाचा संपूर्ण शाश्रोक्त पद्धतीने अभ्यास केला गेला. देशातील प्रत्येक राज्यातून १ हजार पेक्षा जास्त तर ५० हून अधिक देशाच्या अभ्यासकांनी हेच मॉडेल कार्य पाहण्यासाठी आणि अभ्यासन्यासाठी गावाला भेटी दिल्या. अनेक पुस्तके, लेख यावरती लिहिले गेले आहेत. आणि गावच्या आदर्शवत पाणलोट प्रकल्पाचा देशाला आदर्श घालून एक प्रेरणा दिली आहे.
आज पुन्हा एकदा गावाने याच पाणलोट प्रकल्पाच्या आणखी एका स्पर्धेत भाग घेतला आहे ती म्हनजे पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा.
एक गोष्ट सांगायला अतिशय आनंद होईल कि ज्या पाणी फाउंडेशन स्थापनेच्या प्रवासात म्हसवंडी गाव हि एक प्रेरणा होती. पाणी फाउंडेशन स्थापनेपूर्वी सर्व टीमने गावात येऊन गावच्या प्रोजेक्टची पाहणी केली आणि गाव हे आमच्यासाठी एक मॉडेल आहे हेही सांगितलं.
ज्या WOTR संस्थेने पहिला यशस्वी प्रोजेक्ट म्हसवंडी गावामध्ये राबवला आज ती संस्था संपूर्ण भारतामध्ये पाणी क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य संस्था आहे हीच संस्था पाणी फाउंडेशनची नॉलेज पार्टनर देखील आहे.
इतकेच नाही तर गेली गेली दोन वर्ष म्हसवंडी हे गाव पाणी फाउंडेशनचे ट्रेनिंग सेंटर म्हणून काम पाहतय, महाराष्ट्रात सहभागी गावांना ट्रेनिंग म्हसवंडी गाव खूप आनंदाने देत आहे.
या २५ वर्षापूर्वी झालेल्या पाणलोट बदलामुळे आज गावाला पाण्याची तशी कुठलिही टंचाई नाही. गेल्या २५ वर्षात एकदाही पिण्याच्या पाण्याचा टंकर गावात आणावा लागला नाही. पंरतु आम्हाला हे काम थांबायचं नाही आता पुन्हा एकदा भविष्यासाठी करून ठेवायचंय.
बर्यापैकी पाण्याने संपन्न असलेल्या गावाने Paani Foundation पाणी फाउंडेशन आयोजित Satyamev Jayate सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. आणि जोरदार कामाला सुरवात देखील केली आहे. या स्पर्धेत गाव जिंकणार तर आहेच परंतु नाही जरी नंबर आला तरी पाणलोटाच सूत्र गावाला पंचविस वर्षापुर्चीच समजल आहे आणि ज्यात तेव्हा कोणी नव्हत तेव्हाच गावाने हे काम करून स्वतः साठी पानी मिळवून जिंकलच परंतु राज्यातही जिंकल आणि आज जग याचा आदर्श घेतोय हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.
सर्व सहभागी गावांना आम्ही सांगू इच्छितो जिंकन्यासाठी नाही तर पाणी गावात पाहण्यासाठी पानलोटाच काम करा भविष्याच्या पाण्यासाठी काम करा.
या पाणलोट उपचाराचा गुण आम्हाला आलाय तुम्हीही प्रयत्न करा गुण नक्की येईल.