Pages

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

मराठी भाषा दिवस

#मराठी_भाषा_दिवस

मराठी भाषा दिनाच्या आपणास हार्दिक सुभेच्छा.......!

आज बरेच मराठी भाषा दिनाचे ,भाषा – प्रेमाचे, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असे अनेक मेसेज प्राप्त झाले. मुद्दामच मी सगळ्यांना रिप्लाय हा सेम टू यु (same to you ) असा दिला. अपेक्षेप्रमाणे एक दोन व्यक्तींना जाणवले आणि त्यांनी बोलून दाखवले कि तू रीप्लाय इंग्रजीतून दिला आहे.
  पण बर्याच लोकांना हे काही जाणवले नाही याचा अर्थ त्यांनी जास्त मराठी भाषा दिवस आज पण सिरीयसली घेतला नसावा असे मी ढोबळमानाने गृहीत धरून चाललो आहे  परंतु  माझा विचार कदाचित खोटा पण असेल कारण बर्याच लोकांना कळले पण असू शकते पण उलट त्यांनीच मला समजून घेतले असेल हि पण शक्यता शेवटी मी वर्तवून दाखवतो ....उगाच कोणाला राग नको म्हणून .......!

असो...

परंतु आजकाल सोशल मिडियाच्या युगात एखादा दिन साजरे करणे खूप सोपे झाले आहे. एक संदेश पाठवला कि त्याचे साधारणपणे मूर्त रूप तयार होते..पण खरोखरच आपण त्या दिनाच महत्व टिकाव म्हणून काही प्रयत्न करत आहोत का ?
प्रयत्न सोडा हे दिन का याची तरी थोडीफार माहिती घेत आहोत का ? मला तरी वाटत नाही असे आपण करत आहोत ते ....
परंतु असे करायला पाहिजे कि नाही ते प्रत्येकाने ठरवायचे आहे.

आता माझ्या आयुष्यात मराठी भाषेचे महत्व सांगायचं तर सगळ काही मराठी भाषणेच मला दिले असे मी मानतो आणि  त्या मराठी भाषेच्या उर्जीतेअवस्थेसाठी मी काहीतरी योगदान देण्याचा प्रयत्न करायला हवा असेहि मला मनापासून वाटते . जे काही माझ व्यक्तिमत्व प्रस्थापित होत आहे त्यास मराठी भाषाच कारणीभूत आहे असे मी समजतो.

कारण लहानपणी मराठी क्रिकेट कॉमेंट्रीपासून, नंतर मराठीतच भाषणे, सूत्रसंचालन असेल किंवा विविध कार्यक्रमांचे समालोचन असेल  मला माझ्या मराठी भाषेनेच खूप साथ आणि ओळख दिली आहे.  जेव्हा ह्या गोष्ठी करायच्या असतात तेव्हा भाषेचा अभ्यास महत्वाचा ठरतो आणि नकळत तसा अभ्यास होतोही आणि त्यातून जे काही मराठी भाषेत मी तोडक मोडक लेखन करण्याचा प्रयत्न करतो आहे याचे सगळ श्रेय भाषेलाच आहे , यामुळे मी समजतो कि माझ्या रक्तात मराठी भिनभिनत आहे आणि  हे माझे मराठी भाषेसाठी यश आहे.

बालवाडीत लेखनाच्या पाटीपासून ते आतापर्यंतच्या स्मार्टफोन आणि कॉम्पुटर च्या कीबोर्ड पर्यंत सगळीकडे मराठीतच खरडले आहे.(कामाच्या गोष्ठी सोडून) अगदी  chatting च्या बाबतीतहि मी नेहमी मराठीलाच प्राधान्य देत असतो तेही मराठी font मध्ये जेव्हा खरच गरज असेल तेव्हाच दुसर्या भाषेचा उपयोग.(परिस्थितीवर अवलंबून) हेही मराठीवर प्रेमच मानतो.

मी तर अशा अनेक ग्रुप मध्ये होतो जिथे फक्त इंग्रजी भाषा बोलली जात होती परंतु त्यांना देखील मराठीमय करण्यात मी यशस्वी झालो आहे. याचा अर्थ मी तिथे बोलू शकत नव्हतो असे नाही तर ओढून ताढून अनेकांनी बोलण्यापेक्षा आपल्या मातृभाषेत बोललेल कधीही चांगल असत आणि योग्य ठिकाणीच योग्य त्या भाषेचा वापर करण्यात यावा हे सांगण्यात मी त्यांना यशस्वी झालो होतो. याचा अर्थ इंग्रजीला महत्व न देणे नाही तर खरच जेव्हा त्या भाषेची गरज असेल तेव्हा बोलणे हेच आहे. एखाद्याचे standard हे त्याच्या भाषेवरून नाही तर प्रगल्भ विचारांवरून ठरते. आणि प्रगल्भ विचार द्यायला मराठी भाषा आणि मराठी साहित्य खूप मोठी भूमिका बजावत आहे असे मी मानतो.

आपण आपल्या भाषेची गोडी आपल्याला आणि नंतर इतरांना लाऊ तेव्हा आपण त्यासाठी काहीतरी योगदान दिले असे समजू शकतो.
इंग्रजी माध्यमातून  अथवा कॉन्वेंट मधून शिकलेली  अनेक  माझे मित्र-मैत्रिणी मी जे काही कधी-कधी  थोडेफार लिहील ते ‘क’ कला काना ‘का’ करून वाचन करणात आणि त्यावर आपली चांगली प्रतिक्रिया देखील देतात या पेक्षा जास्त समाधान मला दुसरे वाटत नाही.

असो....
परंतु काही गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत.

जे वापरलं जात नाही त्याचा अंत होतो भाषाही अशीच आहे.
भाषा प्रवाही राहिली तर टिकते ,तिच्यात नवनव्या शब्दांची भर पडत गेली तर ती वाढते. जेव्हा एखाधी भाषा आपण प्रमाणभाषा असे म्हणतो तेव्हा इतर बाकीच्या बोली भाषा आपण गावढी ,गावंढळ अथवा त्यांना आपण दुय्यम स्थान देतो. साहजिकच ती भाषा वापरणार्याला न्यूनगंड येतो. (उदा. इंग्रजी न येणाऱ्या व्यक्तीला आपल्याला काहीच न येणे असे वाटल्यासारखे ) आता यासाठी आपण काय करायला पाहिजे हे महत्वाचे आहे. ते सर्वस्वी प्रत्येकावर अवलंबून आहे.

असे म्हणतात कि भाषा मरत नाही परंतु मी असे म्हणेल कि भाषा मरत नाही पण  भाषिक मरतात त्यांचे विचार मरतात. आपल्यापैकी अनेकांना महत्वाच्या व्यवहार क्षेत्रात मराठी भाषा वापरायची लाज वाटते ,अपराधीपणाचे वाटते. कदाचित याला सभोवतालची समाजव्यवस्था जबाबदार असेल.

खर सांगायला गेल तर आपल्याच मातृभाषेपासून आपण दुरावत चाललो आहोत. भाषेच्या शुद्धतेला आपण पारखे होत आहोत. एकीकडे इंग्रजीसारख्या भाषेचा द्वेष तर करायचा नाहीच किंवा त्याचे ज्ञानहि मिळवायचे हे आव्हान आहेच.. त्याचबरोबर आपली भाषा समृद्ध करायची तिचा प्रचार –प्रसार करायचा आणि तिचे चिरंतनत्व अभाधित हे सुद्धा मोठे आव्हान आहे.

आज सर्वजन आपल्या भाषेवर प्रेमदाखवत आहे याचा नक्कीच मला सार्थ अभिमान आहे. आता फक्त याच दिवशी भाषेचा उदोउदो न करता काहीतरी भाषेच्या प्रगतीसाठी गोष्टी आचरणात आणल्या पाहिजे.  आता आचरणात आणणे जमेल का नाही तोही मोठा प्रश्न आहे! परंतु अशा प्रकारचे दिन नक्की का? याची मराठीतून माहिती जरी घेतली तरी ते स्वता:साठी आणि मराठी भाषेसाठी योगदानाच ठरेल.

शेवटी फक्त एकच प्रश्न मनात निर्माण होत आहे कि इतका दैदीप्यमान इतिहास असलेली मराठी भाषेचा वर्तमान इतका केविलवाणा कसा बनत चालला आहे ? त्याला कदाचित आपण सर्वच जबाबदार तर नाही ना ? आणि याचे उत्तर कदाचित हो असे आहे असे मला वाटते.......!

✍🏻गणेश सातकर

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१७

सायकॉलॉजी (मानसशास्र)

#सायकॉलॉजी (मानसशास्त्र)

सायकॉलॉजी (मानसशास्त्र)... प्रत्येक सामान्य व्यक्तीशी निगडीत असलेला हा असा शब्द परंतु तितकाच मेडिकल सायन्समध्ये महत्व असलेला हा विषय. माझ्या मते जितक अनेकांना वाटतो तितका हा विषय सोपा पण नाही आणि जितका मेडिकलचे अभ्यासक सांगतात तितका हा विषय अवघड पण नसावा...

आज एक मेडिकलचा मित्र भेटला सायकॉलॉजी बद्दल बरेच सांगत होता मीही कुतूहलाने ऐकत होतो. सगळ्या गोष्टी मला माझ्याशी निगडीत वाटायच्या मलाही तसा त्या विषयाचा बर्यापैकी वरवरचा अभ्यास होता परंतु फक्त मेडिकल भाषेचा वापर होत होता म्हणून ते मला खूप भारी वाटल एव्हढंच...

माझ्या मते सायकॉलॉजी खरच खूप सोपी आहे. फक्त थोडा प्रगल्भ विचार केला पाहिजे. मानवी मनाचा आणि मानवी वर्तणुकीचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून केलेला शास्त्रोक्त अभ्यास म्हणजेच मानसशास्त्र (सायकॉलॉजी).
आता मानवी मन हा माझ्यासाठी खूप कुतूहलाचा विषय राहिला आहे. आणि त्यात त्याचा वैज्ञानिक अभ्यास म्हटल्यावर खूपच अवघड वाटेल परंतु एक सामान्य माणूस देखील त्या विषयाचा नकळत खूप चांगला अभ्यासक असू शकतो आणि त्याचा चांगला  परिणाम त्याच्या आणि प्रत्येकाच्या थेट जीवनावरच पडत असतो.
सायकॉलॉजीचा थेट सबंध मी लावतो ते व्यक्तीचे मानसिक अनुभव, संवेदना ,भावना ,विचार आणि पुढे जाऊन त्याचे वर्तन म्हणजेच The science of mental life. (मानसिक जीवनाचे शास्र)

खर तर माझ्या भाषेत सांगायचे झाले तर प्रथम : स्वतःच्या आणि नंतर दुसऱ्यांच्या मनाचा केलेला सामान्य अभ्यास म्हणजे  सायकॉलॉजी. आपण नेहमीच आपल्याबद्द्ल आणि कधी कधी  दुसऱ्यांबद्दल काही खोलवर विचार करत असतो. त्यामुळे पुढच्याचं मन ओळखून घेण्याची फक्त गरज असते.

काही उदाहरण देऊन मी सोप्या भाषेत सांगेन कि,
एखाद्या व्यक्तीला काय अपेक्षित आहे आणि काय नाही हे आपल्याला कळलं पाहिजे हा देखील सायकोलॉचाच भाग झाला.
एक साध सोपं उदारहरण द्यायचं झालं तर आपण एखाद्या व्यक्तीबरोबर स्पेशली मुलींबरोबर  चॅट करतो आहे तेव्हा त्या पुढच्या व्यक्तीला काय अपेक्षित आहे किंवा त्या व्यक्तीची आवड काय आहे हे ओळखून त्या विषयावर बोलणे उचित समजतात ज्याला हे कळते तो सायकोलोगी समजण्यात यशस्वी झाला असे मी प्रथम दर्शनी तरी मानेन.  काहींना नेहमी त्यांची तारीफ हवी असते काहींना हसी मजाम तर काहींना गंभीर मुद्दे आता आपण हे समजण्यात यशस्वी झाले पाहिजे किंवा पुढचा व्यक्ती कसा बोलत आहे त्याला खरंच तुमच्यासोबत बोलण्यात रस आहे का? कि उगाच बळजबरीने ओढून ताणून या गोष्टी होत आहेत हे देखील आपल्याला कळलं पाहिजे आणि त्या प्रकारे रेऍक्ट झाले पाहिजे.  याचाच अर्थ कि पुढच्याच मन आपल्याला जिंकता आलं पाहिजे किंवा त्याच्या प्रति आपल्याला सकारात्मक भावना निर्माण करता आली पाहिजे हा एका प्रकारच्या  मानसशास्त्रचा भाग आहे.

आता दुसरी गोष्ट म्हणजे माणसाची वागणूक हि त्याच्या सायकोलॉजिवर अवलंबून असते. सकारात्मक विचार जेव्हा कोणी व्यक्ती करतो तेव्हा तो त्याच्या जीवनात नेहमी खुश असतो भलेलं तो अपयशाच्या दारात जरी उभा असेल तरी. उदा. एखादा पराभव देखीक सकारात्मक दृष्ट्या घेतला तरी त्याचा परिणाम नक्कीच चांगला होण्याची शक्यता असते आणि त्याही पेक्षा आपण आनंदी जीवन जगण्यात त्याचा फायदा होत असतो.
प्रत्येक व्यक्ती प्रत्येक गोष्टीकडे सायकोलॉजिकली पाहत असतो आणि  हीच सायकोलॉजि माणसाच्या जीवनावर प्रभाव टाकत असते. दुसरे एक उदाहरण म्हणजे सायकोलॉजिकली सकरात्मक विचारांचे...
जेव्हा एखादा व्यक्ती बाबा-बुवांकडे जातो आणि कधी-कधी बरा होतो त्याला देखील सायकोलॉजिकल कारण आहे ते म्हणजे त्या बाबा मूळ व्यक्तीला मिळालेला मानसिक आधार यात माणूस त्याच्या स्वताच्या मानसिक जोरावर बरा होत असतो. परंतु  तेव्हा तो बाबा देखील सायकोलॉजि चांगल्या प्रकारे समजलेला असतो.

मानवी मनात इतकी ताकत असते कि पन्नास टक्के आजार हे मानसिक रित्या बरे होतात.  वयक्तिक माझा अनुभव सांगेन कि एका भयानक अपघातानंतर मला भेटायला आलेला माणूस माझी अवस्था आणि माझा चेहरा पाहून पूर्णतः गळून पडत होता परंतु मी मानसिकरित्या मलाच समजावत होतो कि मला काहीच झाले नाही आणि त्याचा खरच फायदा मला लवकर बरा होण्यात झाला त्याहूनही मी स्वताला पहिल्यासारखाच आहे असे समजण्यात झाला. भलेली सत्यात काहीही असो परंतु माझे मन त्यात खूप आहे आनंदी आहे.

पुढे जाऊन मी म्हणेन कि दुसर्यांची मने योग्य रित्या जाणून घेणे त्या व्यक्तीला आधार देणे आणि एका प्रकारे वशीभूत करणे हि देखील एक सायकोलॉजिचा प्रकार आहे.  काही व्यक्ती मुली पटवण्यात किंवा त्यांची मने जाणून घेण्यात खूप एक्सपर्ट असतात माझ्या मते ते देखील एका प्रकारच्या सायकोलॉजिचा अभ्यासक असतात. (मला याचा चांगला अभ्यास करणे गरजेचे आहे)   
अजून एक उदाहरण .... नजर लागणे हा देखील प्रकार मी याच सायकोलॉजि प्रकारात घेतो कारण काही व्यक्तींची नजर हि इतकी प्रभावशाली असते की त्यामुळे  आपले मन वेगळा विचार निर्माण करते आणि त्यातून आपल्याला मानसिक आणि नंतर शारीरिक अस्थिरता वाटते. जसे की एकाद्या  मुलीच्या डोळ्यात पाहिल्यानंतर माणूस तिच्या प्रेमात किंवा त्यांच्याप्रती घायाळ होतो त्याच प्रमाणे...... याचाच अर्थ असा कि सायकोलॉजिकली मन संमोहित होत असते .

शेवटी आणखी एक उदाहरण सांगतो कि भूत हि संकल्पना आपल्यामध्ये रुजली किंवा आपण ती मानतो याचे कारण देखील एक सायकोलॉजिल आहे असे मी मानतो कारण आपल्याला या भुताच्या गोष्टी ह्या आपल्या अशा ट्रस्टेड म्हणजेच विश्वासू व्यक्तीकडून म्हणजेच आपली आई ,आज्जी यांच्याकडून सांगितली जाते आणि त्यावर आपण भाबडेपणाने विश्वास ठेवतो. जेव्हा ते हि गोष्ट सांगत असतात तेव्हा ते आपल्याप्रती एक आभासी त्या भुताचे किंवा तसे चित्र निर्माण करतात हि दुसर्याचे मन मोहित करण्याची एका प्रकारची कला आहे वास्तवात त्या गोष्ठी नसतात परंतु सायकोलॉजिकली त्या गोष्टी निर्माण केल्या जातात. एका प्रकाराचे मन जिंकणे असेल किंवा दुसर्याच्या मनावर विश्वास संपादन करणे असेल शेवटी सायकोलॉजिकल टर्मच.
त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर थोडा वेगळा आणि प्रगल्भ विचार करणे गरजेचे आहे.

शेवटी एकच सांगतो कि सायकोलॉजि( मानसशास्र) म्हणजे दुसर्याच्या मनातले जाणून घेणे असो किंवा आपण सकारात्मंक विचारकरून आनंदी राहणे असो किंवा व्यक्तींच्या विचार ,संवेदना वा वर्तुनुकीचा योग्य अभ्यास वा जाणीव असो ह्या गोष्टी आपल्या आयुष्यावर नेहमीच सुखद  प्रभाव  टाकण्यार्या आहेत आणि राहतील तेव्हा.... .
तेच संकोचित ,कुंठीत ‘मी’ पनाचे जीवन जगायचे कि प्रत्येक गोष्टीचा थोडासा सायकोलॉजिकली विचार करून आनंद देणारा उद्याचा सूर्योदय आणि दिवस पाहायचा....
finally choice is yours….!

✍🏻गणेश सातकर

शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०१७

सण नक्की का????

आज महाशिवरात्री...

सर्वप्रथम महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻

थोडस_वेगळा_विचार.

काल रात्री घरच्यांनी फोन  करून सांगितले उद्या काय आहे माहित आहे का? उद्या महाशिवरात्री आहे लक्षात ठेव !
आणि उपवास धर नाहीतर विसरायचा...!

लहानपणापासून एकच भाबडी गोष्ट असायची किंवा तसे घरच्यांकडून कळले की वर्षातून आषाढी एकादशी आणि महाशिवरात्रीला उपवास धरायचा...आता त्यामागील कारण माहित नाही पण मी मोठे श्रद्धा असलेलं दिवस असा विचार करून उपवास धरतो आणि लहानपणासुनाच भरपूर खिचडी खायची हीच गोष्ट मनात असते.

परंतु रात्री थोडा वेगळा विचार मनात आला आतापर्यंत महाशिवरात्रीचे किंवा उपवास धरण्याचे कारण मला माहीतच नव्हतं तीच सर्वसाधारण माहिती...महादेवाने देवांना हरवून तांडव केला ती रात्र किंवा त्याच्या जन्म झाला तो दिवस किंवा त्यांच्या लग्नाचा दिवस असे....!
परंतु नक्की काय याची उत्सुकता वाटली आणी रात्री 2 वाजता नेटवर विकिपीडिया सर्च करून सगळी माहिती घेतली तेव्हा कुठे आता नक्की महाशिवरात्री का हे समजले...!

अशा अनेक गोष्टी नक्की का माहितच नसतात परंतु त्या आपल्या जीवनाशी खूप जवळून निगडित असतात. त्यामुळं त्यांची माहिती असणे देखील गरजेचे आहे असे मला वाटते.
स्मार्टफोन च्या जमान्यात नेटवर सगळी माहिती मिळते त्यामुळं मी देखील महाशिवरात्री नक्की का ? हे इथे सांगणार नाही आपणच कुरियस माईंड ठेऊन ती घ्यायला पाहिजे असे माझे मत आहे.

लहानपणापासूनच  आंब्याचा मोहोर महादेवाला वाहून पूजा करायची आणि उपवास धरून भरपूर खिचडी खायची यापलीकडे मला तरी याचे महत्व खरच माहित नव्हते आणि  माझ्यासारखे असे अनेक जण असतील.

शेवटी आपण एक सुज्ञान व्यक्ती असताना आपण ज्या समाजात राहतो ,जे काही करतो त्याची थोडीफार माहिती असणे देखील गरजेचे आहे असे मला वाटते.

शेवटी अंधाऱ्या नजरेने पाहून लोकांचे अनुकरण करायचे कि डोळस होऊन अशा अनेक गोष्टीकडे पाहून त्यांचे महत्व समजून घ्यायचे......
Finally choice is yours....!

पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या हार्दिक सुभेच्छा.

      🙏🏻 ॐ नमः शिवाय🙏🏻

✍🏻गणेश सातकर

शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१७

कठोर मन कधीतरी

आपण एखाद्या व्यक्तीकडे एखादी छोटीसी मागणी करतो

तेही पुढच्या व्यक्तीचा विचार करून आणि परवानगीने
आणि तितक्याच चांगल्या भावनेने तेव्हा पुढची व्यक्ती देखील सहनभूतीपूर्ण ती मागणी मान्य करण्याचे आश्वासन देते तेव्हा खूप आशादायी वाटते.
आणि वाटायलाच पाहिजे कारण मागणीही शुल्लक असते.

परंतु जाणूनबुजून म्हणा किंवा नकळत म्हणा पुढची व्यक्ती ती मागणी पूर्ण करण्यात असमर्थ ठरते तेव्हा आपला
अपेक्षाभंग होतो आणि मनाला खूप वाईट वाटते ...!

वाईट जरी वाटले तरी तो नाविलाज असतो कारण आपण पुढच्या व्यक्तीला जाब विचारणा करावी इतका हक्क सांगणार नातं आपलं त्या व्यक्तीबरोबर नसतं.

परंतु तेव्हा आपणचं मोठं मन करून निराश न होता पुढच्या व्यक्तीला माफ करायचं असतं आणि हसतखेळत तेच नातं टिकवून, पुढच्या व्यक्तीच्या सुखदुःखात सहभागी होऊन ते आपले मानून हसत खेळतच त्या व्यक्तीबरोबर पुढचा प्रवास करायचो असतो.

#कठोर_मन_कधीतरी

बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१७

माझ्या गावाकडील इलेक्शन....!

#माझ्या_गावाकडील_इलेक्शन.....!

उद्या जिल्हा परीषद आणि पंचायत समिती यांचे पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. प्रचाराची रणधुमाळी काल संपली. मतदानाला जाणार कि नाही याबाबत अजूनही माझी साशंकता होती.  परंतु एक सुज्ञान नागरिक आणि सामाजिक भान ठेऊन मतदानाला जायला पाहिजे अस म्हणत एका मनाने दुसर्या मनावर विजय मिळवला आणि सर्व संभ्रम दूर करून आता मतदानाला जायचच अस ठरवलंय. 
परंतु त्याही पेक्षा एक आदर्श व्यक्तिमत्व आणि  कार्यक्षम उमेदवार या जिल्हा परिषदेच्या बोटा गटातून  निवडणुकीच्या रिंगणात उभा असल्यामुळे आणि माझे त्यांच्याबरोबर एक भावनिक आणि प्रेरणादायी नात असल्यामूळे मतदानाच्या स्वरुपात त्यांना साथ देण हेहि मी माझ कर्तव्यच समजतो.

माझ्यासाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व *गागरे बंधु*....!
खूप दिवसांपासून निवडणुकीची उत्सुकता होती आणि त्यात बरेच दिवस थोडेफार त्याबद्दल आढावे देखील घेत आहे. शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय पक्षांपेक्षाही व्यक्तीची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळेच एक कार्यक्षम असे व्यक्तीमत्व  या भागाच्या विकासात मुख्य भूमिका बजावेल असे माझे मत आहे  आणि माझ्या मते ते व्यक्तिमत्व असेल गागरे बंधू.

तसे पहायला गेले तर कॉंग्रेसचे नेतृत्व करणारे बाळासाहेब थोरात आणि आझ्या कुटुंबियांचे चांगले सबंध आहे. अनेक सुखदुखात ते आमच्या बरोबर उभे राहिले आहे. एव्हढेच काय म्हसवंडीच्या विकासामध्ये म्हणजेच पाणलोट प्रकल्पामध्ये त्यांचा खरच मोलाचा वाटा आहे परंतु प्रश्न असा आहे कि उमेदवार कोण आहे ?
पक्ष म्हणून नाही तर उमेदवार म्हणून मला मतदान करायचे आहे त्यामुळे मी नक्कीच थोडा वेगळा विचार करीन.

त्यामुळे एक व्यक्ती म्हणून त्याला समांतर असा उमेदवार, एक व्हिजनरी, ध्येयवादी , निर्णयक्षम आणि कार्यक्षम असे व्यक्तीमत्व मी निसंकोश करून सांगेल ते म्हणजे गागरे बंधू.
कारण त्याच्यामागे एक सामान्य नागरिक म्हणून माझा  वयक्तिक अनुभव आहे.

माझ्यासोबत घडलेला आणि गागरे साहेबांचा वाटा असलेला एक खूपच भावनिक प्रसंग मला आठवतो.

साधारण एक वर्षापूर्वी पुण्यामध्ये माझा भयानक अपघात झाला होता, माझ्या जीवनातील सर्वात भयावह तो काळ आणि ते काही दिवस सुद्धा.

तेव्हा अपघात झाल्यानंतर लगेच मला तिथल्या जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. एका दिवसानंतर मला दुसर्या दवाखान्यात हलवण्याचा निर्णय घेतला गेला. घरचे सगळे तिथे नवखेच होते त्यांना माझे दु:खच अनावर होते त्यामुळे माझे मित्रमंडळींच सगळी जबाबदारी पार पाडत होते. तेथून दुसर्या दवाखान्यात हलवण्यासाठी तिथले एका रात्रीत भरमसाठ बिल आले होते ते भरूनच पुढे दुसर्या दवाखान्यात हलवता येणे शक्य होते. दिवसभरात पैसे अरेंज करताही आले असते परंतु ती वेळ महत्वाची होती. स्थानिक मित्रांनी शक्य तेव्हढी ओळख काढून थोडाफार बिल कमी करण्याचा प्रयत्न केला परंतु तरीही योग्य कमी झाला नव्हता. त्याच वेळी माझ्या गावाकडील आंबी दुमालाच्या  एका मित्रांने गागरे साहेबांना फोन केला आणि प्रसंग सांगितला... त्याने त्यांना एव्हढंच सांगितले कि आपल्या गावाकडील मुलगा आहे, असेअसे  झाले आहे आणि हा प्रोब्लेम आहे. (त्यावेळी मी नक्की कोण आहे, काय करतो, कुठला आहे, त्यांना काहीच माहित नव्हते).  क्षणाचाही विलंब न लावता मला फक्त हॉस्पिटलचे नाव ,पत्ता,डॉक्टरचे नाव पाठव असे गागरे साहेबांनी मित्राला सांगितले. अवध्या पंधरा मिनिटाच्या कालावधीत स्थानिक लोकप्रतिनिधींचा फोन डॉक्टरप्रशासणाला येऊन बिल कमी कमी झाले होते त्याचवेळी   त्यांनीही मित्राला  फोन करून सांगितले कि फक्त साठ टक्के पैसे भरा,लगेच दिक्चार्ग करा व  दुसर्या दवाखान्यात हलवा आणि तरीही काही प्रोब्लेम आला तर सांगा.

खर सांगायला गेल तर अतिशय संकट समयी आणि खर्या दुखा:च्या काळात सर्वच मित्रांनी आणि स्पेशली गागरे बंधूनी अप्रत्यक्ष केलेली मदत हि माझ्यासाठी खूप मोठी होती.  

काही दिवसानंतर मी बरा झाल्यावर मला हि गोष्ट कळली. मनातच विचार करत होतो...  खरच कोण होतो मी त्यांच्यासाठी, का केलं माझ्यासाठी, सामाजिक बांधिलकी म्हणून कि इंतर काही सगळे प्रश्न माझ्यासाठी अनुतीर्ण होते.

एक कृतज्ञता म्हणून काही दिवसानंतर त्यांचे आभार मानण्यासाठी भेटलो.
तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उमजले. आभार मानताच त्यांनी एक वाक्य सांगितले  कि आपण जेव्हा सामाजिक कार्य करतो तेव्हा ते कोणासाठी करायचे आणि कोणासाठी नाही हे कधीच ठरवायचे नसते. जे काम आपल्या परीने शक्य असेल ते काम आनंदाने करणे म्हणजेच सामाजिक कार्यात स्वताचा आनंद आहे.
आपल्या व्यस्त शेड्युल मधून वेळ देऊन जवळ-जवळ दीड तास त्यांनी माझ्यासाठी दिला.
हुशार, कर्तबगार, निर्णयक्षम, ध्येयवादी, महत्वाकांशी, सहनशील, असे अनेक गुण एकाच व्यक्तिमध्ये पाहण्याचा योग दुर्मिळ असतो पण मला ते त्यांच्यामध्ये दिसले. एक यशस्वी उद्योजक असल्यामूळ उच्चशिक्षण आणि करियर याबद्दल एक योग्य असे मार्गदर्शन मिळाले.
माझ्या गावात चालू असलेले अनेक उल्लेखनीय कामे त्यात महिला बचत गट असेल,पाणलोट क्षेत्र प्रकल्प असेल तरुणानाची एकता फौन्डेषण असो किंवा इतरही अनेक गोष्टी त्यांनी बारकाईने जाऊन घेतल्या आणि सदैव अशा प्रकारच्या प्रत्येक चांगल्या कामात आमचा पाठींबाच आणि सहभाग राहील असेहि त्यांनी सांगितले.
नुसते सांगितले नाही तर पुढील काळात त्याचा प्रत्यक्षात अनुभव देखील दिला यातून खरच त्यांचा प्रत्येक गोष्ठीमधला सहभाग जाणवला.  

खरच मी खूप भावनाविवश झालो होतो....!

असो....

परंतु त्यांच्या काही गोष्ठी मला खूप प्रेरनादायी ठरल्या आहेत,
कधीही कुठेहि भेटले तरी पहिले करियरबद्दल विचारणा आणि त्याचे योग्य मार्गदर्शन, कारण त्यांचे म्हणणे असे आहे कि आपल्या खेड्यातील मुलांनी पहिले उच्चशिक्षण घेऊन आपण आपल करियर घडवायचं आणि त्यातून वेळ काढूनच सामाजिक कार्य करायचं. कारण ज्या समाजात, ज्या भागात आपण जन्मलो त्याचे आपण  काहीतरी देणे लागतो हे त्यांचे नेहमीच सांगण असत.
एका सामान्य कुटुंबातील व्यक्ती ते एक यशस्वी उद्योजक हा त्यांचा प्रवास आणि त्यांनतर सामाजिक क्षेत्रात केलेलं उल्लेखनीय काम हे कौतुकस्पद आहे. त्यांच्या बोलण्यातून त्यांची व्हिजनरी,ध्येयवादी तत्वे दिसतात. त्यांनी केलेल्या कामातून त्यांची कार्यक्षमता दिसते.  त्यांच्या स्वभावातून त्यांची सर्वसामान्यांप्रती असलेली आपुलकी दिसते. पठारभागात स्वखार्तून केलेल्या कामांमुळे त्यांची निस्वार्थी वृत्ती आणि त्यांची निर्णयक्षमता दिसते. राजकारण करण्यापेक्षा समाजकारण हे त्यांचे प्रेम. कारण अनेक उमेदवारांना पक्षाची पदे सांभाळून सामाजिक कामे करणे कठीण जाते कारण त्यांना पक्ष वाढवणे हि मोठी जबाबदारी असते. परंतु गागरे बंधू हे एका पक्षाकडून जरी उभे असतील तरी त्यांना त्या पक्षाची कुठली राजकीय जबाबदारी नाही. अनेक मोठ्या कॉम्पेटीशनमधून त्यांना तिकीट मिळाले आणि ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून उभे आहेत तसा वयक्तिक मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा चाहता नाही परंतु एक व्यक्ती म्हणून मी त्यांना साथ देत आहे.

मी आशा करतो कि असा व्यक्ती पठारभागाचे पुढील काळात नेतृत्व करेल आणि असे जर झाले तर त्याचा मला आनंदच होईल कारण त्याचा नक्कीच फायदा सर्वच पठारभागाला होईल. 

शेवटी सर्वांना एकच सांगतो मतदान कोणालाही करा परंतु  या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष बघून नाही तर एक माणूस बघून मतदान करा. जो आपल्या भागाच भवितव्य घडवेल.

Finally choice is yours……! 

✍🏻गणेश सातकर