Pages

रविवार, ४ ऑगस्ट, २०१९

आदर्शवाद, प्रेम, सहृदयता आणि आजचे वास्तव…!

आदर्शवाद, प्रेम, सहृदयता आणि आजचे वास्तव…!
रात्री एक वाजले तरी झोप येईना तर असेच यु ट्युब वर अमोल पालेकर आणि चित्र पालेकर यांचा ‘थोडासा रूमानी हो जाए’ हा खूप जुना चित्रपट पाहायला सुरुवात केली थोडा आवडला आणि मग पूर्ण पाहिला. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी आवर्जून पाहावा.
त्यातुन प्रेरित होऊन काही गोष्टी….!
स्वत:विषयीच्या कल्पना, स्वप्न, प्रेम, आदर्शवाद आणि आजूबाजूची माणसे यांचे वागणे कसे असते याचे हळुवार चित्रण यात आहे.
माणसाने आनंदी असावे, आपल्याच विश्वात रमावे हे खरे असतेच. असा आपल्याच जगात रममाण होणारा माणूस इतरांना वेडासुद्धा वाटू शकतो. इतर सर्व जण अशा व्यक्तींची खिल्ली उडवत असतात. पण ही माणसे वेडी नसतात आणि त्या विश्वात एकटीही नसतात. प्रत्येकाला साथ हवी असते हेच हा चित्रपट अधोरेखित करतो. ही साथ कशी हवी असते? त्याकरता माणसे कशी वागतात? अशा विविध बाबी मनात घर करून जातात.
प्रेमातही हीच साथ असावी ही मूलभूत अपेक्षा असते. प्रेमात असलेली, प्रेम करणारी माणसे आनंदी असतात, उत्साही असतात हे एक चित्र असते. काही वेळा ती प्रेमाविषयी जरा साशंक सुद्धा असतात. दोन्ही स्थितीत त्यांची स्वप्ने पाहणे मात्र थांबत नाही. काय असते त्या स्वप्नात? ज्या व्यक्तीवर प्रेम करतात त्या व्यक्तीची विविध रूपे माणसे मनात कल्पित असतात.
थोडक्यात त्यांच्या स्वप्नात असलेली व्यक्ती आणि प्रत्यक्षात जिच्यावर प्रेम आहे ती व्यक्ती यात खूप अंतर असते. अनेकदा आदर्शवाद किंवा जे परफेक्ट आहे असे चित्र, परिपूर्ण वाटते तेच चित्र माणसे मनात साकारत असतात. वास्तवात समोर असलेली व्यक्ती मात्र त्यापासून कोसो दूर असते. हा एक प्रकारचा वेगळा धोका असतो. तुम्ही,आम्ही, आपण सर्व जण अनेकदा अशाप्रकारे वागतो.
ज्या व्यक्तीवर प्रेम आहे ती व्यक्ती, तिचे दोष सगळे माहिती असूनही मनात आपण आदर्शवादी चित्र रेखाटतो. त्यामुळे वास्तवात तीच व्यक्ती आणखीनच वेगळी वाटते. काहीसा अपेक्षाभंग होतो आहे असे सुद्धा जाणवते. हे जाणवत असलं तरी परफेक्ट वा आदर्श जोडीदार असावा ही भावना मनात इतकी घट्ट रूजली असते की आपण भ्रमात राहणे मान्य करतो.
वास्तवातल्या व्यक्तीने मनातल्या व्यक्तीसारखे वागावे अशी अपेक्षा अनेक जण बाळगून असतात. आदर्श आणि वास्तव यात अंतर असते. ते अंतर कसे कमी होईल? त्यादृष्टीने आपण प्रयत्न सुरू करतो. प्रेम आहे तर मग प्रेमासाठी बदल केले तर काय बिघडलं ही भावना सुद्धा असतेच.
स्वप्नरंजन करू नये असे नाही. पण स्वप्न प्रत्यक्षात यावे याचा हट्ट मात्र नसेल तर उत्तम. हा हट्ट म्हणजेच आदर्श जोडीदाराची अपेक्षा. तो हट्ट प्रेमाला घातक ठरतो. त्यापेक्षा वास्तवातली व्यक्ती आपली माणसे ज्यांना जमते ती माणसे प्रेमात अधिक यशस्वी होतात.
प्रेम कमी झाले वा प्रेम नाही ही भावना मनात असणेच अतिशय नकारात्मक आहे. त्यामुळे जोडीदाराची पुढची प्रत्येक कृती, प्रत्येक शब्द अगदी चुकीच्या दृष्टीने बघितला जातो असे दिसते. जोडीदारच काय कोणतेही नाते तुटण्याची, दुरावण्याची ही सुरुवात असते. हे नाते तुटू नये म्हणून त्याकरता वेळ देणे, योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. त्यातला मुख्य भाग आहे वास्तवाचा स्वीकार.
आपला मित्र-मैत्रीण वा आपला जोडीदार जसा आहे, तसा गुणदोषासकट स्वीकारणे ही त्याची पहिली पायरी आहे. हा स्वीकार आयुष्यभर करायचा आहे. हा स्वीकार केला की आदर्श आणि वास्तव यातली दरी नाहीशी होते. मित्र-मैत्रीण वा जोडीदाराला आपल्या अपेक्षेनुसार बदलण्याची असोशी कमी होते. आपल्या जवळच्या माणसाचे दोष शोधण्यापेक्षा त्यात काय चांगले आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा तर नाते अधिक पक्के होईल.
आपल्या व्यक्तीत जे चांगले आहे त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचा उघड उल्लेख करणे सुद्धा गरजेचे आहे. चांगले पाहायचे म्हणजे दोषांकडे दुर्लक्षच करायचे असे नाही. दोष सांगताना त्या व्यक्तीला मदत करण्याची तयारी ठेवा. परिस्थिती आणि वेळ याची योग्य दखल मनात असू द्या. त्यामुळे दोष सांगणे बोचरे होणार नाही.
आपल्या जवळच्या व्यक्तीचे दोष सहृदय होऊन पाहिले तर इतरही अनेक गोष्टी दिसतील. आपण जर आदर्श नाही तर दुस-या कुणाकडून आदर्शाची अपेक्षा करणे चुकीचे आहे ही शिकवण मनात अधिक रुजेल. आजच्या बडेजाव आणि खोटया दिखाव्याच्या जमान्यात आपल्या समोर आलेले चित्र अधिकच खोटे असू शकते. ते आदर्श मानणे हे तर धोक्याचेच. अशावेळी फसवणूक टाळण्यासाठी वास्तवाचा शोध घेणे महत्त्वाचे. आपली जवळची व्यक्ती आपल्याला फसवते आहे ही भावना आणि अपेक्षाभंग दोन्ही प्रेमाला घातक आहेत.
आदर्शापासून फारकत घेऊन, वास्तवाला स्वीकारण्याची तयारी यातच खरे प्रेम दडले आहे. खोटा दिखावा वा आदर्शाचे स्वप्नरंजन हे दोन्ही टाळता आले तर उत्तम. स्वप्नरंजन आवश्यक असेल; पण आपल्या व्यक्तीचा स्वीकार फक्त स्वप्नरंजनाने करता येत नाही. प्रेम हे डोळस असावे, सहृदय असावे एवढे मात्र खरे. तसे झाले तर माणसे अधिक सुखी होतील.
प्रेम मिळेल, टिकवता येईल. त्यामुळे येणारे स्थैर्य अनेक चांगल्या गोष्टी घडवून आणेल. हे सोपे नाही; पण अशक्य सुद्धा नाही. अनेकदा आपल्या अवास्तव कल्पनांमुळे नाती जोडण्यापेक्षा ती टिकवण्यात खूप ऊर्जा आणि वेळ खर्च होतो. हा वेळ नक्की वाचेल. जगातली प्रत्येक यशस्वी माणसाची आणि आपल्या व्यक्तीची तुलना करायची गरज भासणार नाही.
✍- एस. गणेश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा