Pages

गुरुवार, ३० मार्च, २०१७

आपुलकी मायेची

#आपुलकी_मायेची

एखाद्यादिवशी खिशाला पेन नसला म्हणजे दिवसभर काहीतरी हरवल्यासारखं होतं,
माणसाचंही भलतच आहे हा, नाही म्हणजे आयुष्यात कोण कधी कशी जागा व्यापुन घेईल सांगताच येत नाही, मग ती सजिव असो वा निर्जिव. यात अट फक्तं एकच माणसाचं हृदय सजिव असलं पायजे, जिवंत. मग समोरच्या गोष्टीचं अस्तित्व तो मान्य करतोच करतो!!....

लहानपणी एखाद्या गोष्टीच्या हव्यासापोटी घरात तांडव करूनही प्लॅन सक्सेस होत नाही अस दिसताच (म्हणजेच एखादी गोष्ट पाहिजेच आहे आणि ती सर्व काही करून मिळत नाही असे दिसताच ) मी माझ जवळचं हक्काचं आधारकार्ड बाहेर काढायचो, ते म्हणजे काही झालतरी रात्री जेवायचं नाही.....
        

रात्र झाल्यावर भुकेमुळे कधी ह्या कडेवर तर कधी त्या कडेवर लोळलाळ सुरू व्हायची..पोटात पडणार्‍या भुकेच्या आगीने न राहवून अर्ध्यारात्री सर्व झोपलेत अशी खात्री करून मी उठून बत्तीच्या(चिमणी) प्रकाशात भाकरीचे टोपले चाचपाडायचो. तोच, टोपल्यात व्यवस्थित वरून फडक्याने झाकून एक ताट वाढून ठेवलेलं दिसायचं.  मी घास दोन घास खात नाही तोच कुणाचेतरी हात डोक्यावरून मायेनं फिरायचे, .. नजर वर करून बघायचो तर आई किंवा आजी  बाजुला बसलेली दिसायची.

         पोटचं मुल ज्या दिवशी रागारागाने जेवलं नाही खरं सांगतो त्यादिवशी त्याच्याबरोबर घरातल्या माय माऊलीच म्हणजेच आपल्या आईचे पोटही खपाट आहे म्हणुन समजायचं.  आता थोडी समज आल्यानंतर मी हे बोलतोय, अनुभवतोय आणि समजतोय सुद्धा.

माझी आई पण माझ्या बरोबर जेवायची, माझ्याबरोबर ताटात जेवायला लागली की ती वस्तु मिळाली नाही त्या दुःखाने म्हणा की आईच्या मायेने म्हणा डोळ्यातले एक दोन अश्रु ताटात पडायचे, त्याने जेवण्याची चव कधी बदलली नाही उलट अधीकची चव यायची. डोळे डबडबून ताटातली भाकर बत्तीच्या मंद प्रकाशात धुसर होऊन पण डोळ्यातच मोत्यासारखी चमकायची.

परंतु आज खंत एकच आहे कि आज बरेच वर्ष मी बाहेर आहे. तरीही  मला खात्री आहे आजही मी कधी असा झोपलो तर आई तशीच उपाशी राहील माझ्यासाठी ह्यात दुमत नाही....!

थोडा भावनाविवश झालो आहे. होतो कधी-कधी असा मी....
असो....!

    माईची माया अफाट असते ती माझ्यासाठीच नाही तर प्रत्येक आईची आपल्या मुलासाठी. बसमध्ये बसलोय, समोरच्या सिटवर एक आई आपल्या लहानशा गोडूल्या बाळाला खिडकीतून बाहेरचा नजारा दाखवत पॉपकॉर्ण  खाऊ घालतेय, हे दृश्य बघून अचानक आईची आठवण झाली. अवघडच आहे माणसाच् कधी काय आठवेल सांगताच येत नाही....!

शेवटी एकच,
राग नको....लोभ हवा.....!

✍🏻 गणेश सातकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा